नागपूर : पाचशे वर्षे धर्मासाठी धैर्य दाखवून संविधानिक मार्गाने आज राम मंदिर उभे झाले आहे. मात्र, काँग्रेसचा अहंकार आजही गेलेला नाही. भगवान श्रीरामाचे अस्तित्व नाकारून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवायचा, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींचाही चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधींना आवाहन आहे. त्यांनी देशातील कुठलेही एक मैदान निवडावे. आम्ही त्यांच्याशी चर्चेला कधीही तयार आहोत. भाजयुमोचा एक साधा कार्यकर्ताही राहुल गांधींना चर्चेमध्ये हरवू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
नागपूर विद्यापीठाच्या मैदानात सोमवारी झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
स्मृती इराणी म्हणाल्या, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे. विकसित भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. पाचशे वर्षे धैर्य राखून आपण राममंदिराची वाट पाहिली. आज मोदींच्या सक्षम नेतृत्वामुळेच संविधानिक मार्गाने मंदिर उभे आहे. परंतु, भगवान श्रीरामाचे अस्तित्वच नाही असे शपथपत्र न्यायालयात दाखल करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा अहंकार आजही गेलेला नाही. त्यांनी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले. सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याचे पुरावे काँग्रेसने मागितले. अशा अहंकारी पक्षाला युवकांनी धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबरला हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी जल्लोष करत होते, असा आरोपही इराणी यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या निवडणुकीत मोदींना विजयी करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, संचालन भाजयुमोच्या पदाधिकारी शिवानी दाणी यांनी केले.
हेही वाचा – वाशिम लोकसभेचा उमेदवार कोण? भावना गवळी की संजय राठोड? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
शिवसेना, राष्ट्रवादी परिवारवादी : तेजस्वी सूर्या
शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंनंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनंतर कुठला नेता त्या पक्षाचे नेतृत्व करेल हे जनतेला माहिती आहे. हे दोन्ही परिवारावादी पक्ष असल्याची टीका तेजस्वी सूर्या यांनी केली. केवळ भाजप एकमेव असा पक्ष आहे जेथे कामाला आणि चारित्र्याला महत्त्व आहे. त्यामुळेच आज एक चहावाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकला, असेही ते म्हणाले.