वाशिम: गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात रेशनच्या तांदळाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेशनच्या तांदळाला काळ्या बाजारात चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यात रेशन माफिया सक्रिय झाले असून यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यामुळे रेशनचा तांदूळ जातो तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रिसोडच्या तहसीलदारपदी रुजू झाल्यानंतर प्रतीक्षा तेजनकर यांनी रेती माफिया, तांदूळ माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजतादरम्यान रिसोड शहरातील महात्मा फुले नगर येथे छापा टाकून तांदळाचे ५१० कट्टे व ट्रक असा एकूण १६ लाख २६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. मात्र ट्रक चालक फरार झाला असून या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा… हत्याकांड, जन्मठेप अन् पॅरोलवर सुटताच कैदी फरार; तीन वर्षांनंतर पोलिसांनी….
संपूर्ण जिल्ह्यात रेशनची तस्करी होत असताना कारवाया केवळ रीसोड येथेच होत असल्याने इतर ठिकाणी प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व रेशन माफियांमध्ये संगनमत तर नाही ना ? याचा शोध घेण्याची गरज आहे.
लोणी रेशन माफियांचे माहेरघर, कारवाई कधी?
तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर, बाळासाहेब दराडे निवासी नायब तहसिलदार तथा प्रभारी निरीक्षण अधिकारी पुरवठा विभाग, गोदामपाल बळीराम मुंडे, पी.बी बायस्कर तलाठी रिसोड, पोलीस निरीक्षक उत्तम गायकवाड आणि दोन पोलीस अमलदार यांनी रिसोड येथे कारवाई केली. रेशन माफियांचे माहेरघर म्हणून परिचित असलेल्या लोणी येथून रेशनचा तांदूळ इतर जिल्ह्यात जातो. मात्र येथे प्रशासन कधी कारवाई करणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.