आठ दिवसांपासून वनखात्याला चकमा देणाºया वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपीला अखेर मध्यप्रदेशातील बिछवासहानी या गावातून अटक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनी नागपूर वनविभागाने ही कामगिरी यशस्वी केली. आरोपीच्या घरातून वाघाची संपूर्ण कातडी, चारही पायांचे पंजे आणि शिकाऱ्याचा जिओ कंपनीचा फोन जप्त करण्यात आला.

नागपूर वनविभागाला आठ दिवसांपूर्वीच वाघाच्या अवयवाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच वनखात्याची चमू शिकाऱ्याचा मागोवा घेत होते. गुरुवारी सकाळी त्यांना आरोपी सावनेर येथे येत असल्याचे कळले. त्यानुसार त्यांनी सापळा रचला, पण आरोपी हा मध्यप्रदेशात गेल्याचे माहिती देणाऱ्याने सांगितले. त्यानुसार वनखात्याचे पथक मध्यप्रदेशात पोहोचले. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशातील बिछवासहानी या गावात धाड टाकली. वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या मोतीलाल के जा सलामे या आरोपींला वनखात्याच्या पथकाने ताब्यात घेतले. आरोपीच्या शेतशिवारातील घरातून मृत वाघाची संपूर्ण कातडी, चारही पायाचे पंजे आणि आरोपीचा जिओ फोन जप्त केला. आरोपी मोतीलाल सलामे याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या कलम २(१६), ९, ३९, ४९, ४३(अ), ५० व ५१ नुसार वनगुन्हा  नोंदवण्यात आला. आरोपीला शुक्रवारी सकाळी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे हजर करण्यात आले असता त्याला तीन ऑगस्टपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख व उमरेडचे सहाय्यक वनसंरक्षक एन.जी. चांदेवार, खापा वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एन. नाईक, बुटीबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही. ठोकळ, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. मोहोड, खापा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक डोंगरे, शेंडे, भोसले यांनी केली. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक एस.टी. काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

चारही पंजे आणि कातडी तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तर वाघ नेमका कुठला असावा यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाकडे छायाचित्र पाठवण्यात आले. त्यावरुन वाघाचे वय आणि शिकार नेमकी कशामुळे झाली हे कळू शकेल. दरम्यान, अटकेत असलेल्या आरोपीने मात्र हा वाघ छिंदवाडा येथील असल्याचे सांगितले.