नागपूर: सरडा रंग बदलतो हे सर्वांनाच माहिती आहे, पण येथे तर चक्क सापाने रंग बदलला. एरवी पांढरा sap कधी कुणी पाहिला नसेल, पण नागपुरात चक्क पांढरा साप आढळला.मांडुळ ही शेतात आढळणाऱ्या बिनविषारी सापाची जात आहे. याला दुतोंड्या, मातीखाया, मालण अशीही नावे आहेत. जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे. मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. लालसर किंवा तपकिरी रंग, पोटाचा रंग फिकट तपकिरी तोंड व शेपटी आखूड असते. तोंड शरीराच्या मानाने बारके असल्यामुळे मातीत, वाळूत सहज शिरता येते. भक्ष्याभोवती विळखा घालून त्याचा जीव गेल्यावर हा साप भक्ष्य गिळतो. अंधश्रद्धेमुळे अनेकजण काळी जादू, गुप्तधन शोधणे यासाठी या सापाचा उपयोग करतात. या अंधश्रद्धेतूनच हा साप लाखो रुपयांत विकण्यात येत असतो.
सोमवारी दहा फेब्रुवारीला दुपारी १२.३० वाजता, उमेश भोयर, राहनार वाठोडा यांनी वन्यजीव कल्याण संस्थेचे सदस्य लकी खोलोडे यांना फोन करून सांगितले की त्यांच्या घरी एक पांढरा साप दिसला आहे. माहिती मिळताच संस्थेचे सदस्य लकी खोलोडे, नितीश भांडाकर, अभिषेक सहारे घटनास्थळी पोहोचले आणि तपासात त्यांना एक दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा “कॉमन सँड बोआ” (माटीखाया) साप आढळला. त्याला पकडण्यात यश आले आणि जंगलात सोडण्यात आले.
जेव्हा सापामध्ये मेलेनिनची कमतरता असते तेव्हा तो रंग मिळवू शकत नाही आणि त्याचा रंग पांढरा होतो. म्हणजेच, असे म्हणता येईल की सापाचा मेलेनिन त्याच्या पांढऱ्या रंगासाठी जबाबदार आहे. अल्बिनो साप क्वचितच आढळतात आणि अत्यंत दुर्मिळ आहेत, असे वन्यजीव कल्याण संस्थेचे सचिव नितीश भांदककर यांनी सांगितले. अनेक प्राण्यांमध्ये अलीकडच्या काळात मेलेनिन ची कमतरता आढळून येते. त्यामुळे हे प्राणी कधी पांढरे तर कधी काळे दिसून येतात.
या सापाची मादी सप्टेंबर महिन्यात सात ते नऊ पिलांना जन्म देते. या सापाचे मुख्य खाद्य हे उंदीर, पाली, सरडे आणि लहान पक्षी हे आहे. हा साप मुख्यत्वे करून खडकाळ भागात आणि रेताड जमिनीवर अधिक आढळून येतो. तसेच शहरी भागाच्या अवती भोवती याचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. निशाचर स्वरूपाचा हा साप घात लावून आपली शिकार करतो. आज अंधश्रद्धे पोटी आणि चुकीच्या माहितीमुळे हा साप हळू हळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग व नैसर्गिक संसाधन संवर्धन संघ यांच्या नुसार हा धोकाग्रस्त प्रजाती मध्ये मोडल्या जातो.