नागपूर : ब्रिटिशकालीन महाराजबाग प्राणिसंग्रहालय म्हणजे काही वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी पर्यटनाचे उत्तम ठिकाण. याच महाराजबागेत काही दशकांपूर्वी सिंहाची एक जोडी होती आणि त्यांच्या डरकाळ्यांनी आजूबाजूच्या परिसरातील लोकांची झोप उडायची. मात्र, आता हेच प्राणिसंग्रहालय गाजतेय ते वेगळ्या कारणांनी. सातत्याने याठिकाणी प्राण्यांच्या पिंजऱ्यात साप, नाग शिरण्याच्या घटना वाढत चालल्या आहे. त्यामुळे येथील प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सहा वर्षांपूर्वी सर्पदंश झाल्यामुळे महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील ‘जाई’ नावाच्या वाघिणीचा मृत्यू झाला होता.सापाने वाघिणीला दंश केल्यावर तिची प्रकृती खालावली. किडण्या निकामी झाल्या होत्या. त्यानंतर उपचारादरम्यान सहा महिन्यांनी तिचा मृत्यू झाला होता.त्यानंतर २०२३ मध्येही याच घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली.या प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात चक्क नागोबाने प्रवेश केला. कर्मचाऱ्यांना ते लगेच निदर्शनास आले आणि त्यांनी नागाला बाहेर काढले. या प्राणिसंग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात चक्क कोब्रा साप जाऊन बसला होता. मात्र हा प्रकार लक्षात आल्यावर सापाला पकडून बाहेर सोडून देण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. रविवारी पुन्हा एकदा मोराच्या पिंजऱ्यात नागोबाने प्रवेश केला. वेळीच ही घटना लक्षात आल्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राणी कितपत सुरक्षित आहेत, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा…नोंदणी विवाहाकडे नव्या पिढीचा कल, रशियन युवक म्हणतो हेच बरं.
पहिल्या दोन घटनेनंतर महाराजबाग प्रशासनाने सर्वच प्राण्यांच्या पिंजऱ्याभोवती बारीक छिद्रांची मूर्गा जाळी लावली होती. या काळात त्या सडल्यावरही पुन्हा बदलविण्याकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामत: तशाच घटनेला सामोरे जावे लागले. महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचा परिसर झाडीझुडपांनी वेढलेला असून बाजूलाच नाला वाहतो. या परिसरात मोठ्या प्रमाणावर सापांचा वावर असल्याने प्राण्यांसाठी हे धोकादायक आहे. या संपूर्ण परिसरात वारंवार सापांचे दर्शनही घडत असते. महाराजबाग प्राणिसंग्रहालय हे ब्रिटिशांनी त्यांच्या काळात स्थापन केले. त्यानंतर या महाराजबागेची धुरा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या नागपूर येथील कृषी महाविद्यालयाकडे सोपवण्यात आली. मात्र, ब्रिटिशांनी सोपावलेल्या या वास्तुबाबत महाविद्यालय गंभीर नसल्याचेच दिसून येते. या संदर्भात महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांना विचारणा केली असता, या घटनेला त्यांनी दुजोरा दिला. लावलेली जाळी जुनी झाल्याने ती सडली आहे. नवीन जाळी लावण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले.