अकोला : घरात ‘लव्ह बर्ड’ पिंजऱ्यात ठेवणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. ते पक्षी खाण्यासाठी अत्यंत विषारी-बिनविषारी साप घरात येऊ शकतात. त्याचा प्रत्यय अकोला शहरातील दोन कुटुंबांना आला. दोन वेगवेगळ्या घरांमध्ये ते पक्षी खाण्यासाठी आलेले साप पिंजऱ्यांमध्ये अडकले. ज्येष्ठ सर्पमित्र व मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी त्या सापांना पकडून त्या दोन कुटुंबियांना भयमुक्त केले.
गीता नगर येथील रहिवासी इंगळे यांच्या घरामध्ये ‘लव्ह बर्ड’ पक्षी पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आला होता. हा पक्षी सापांचे खाद्य आहे. त्यामुळे एक मोठी सात फूट धामण त्यांच्या घरात शिरली. कुटुंबाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सर्पमित्र बाळ काळणे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ त्यांचे घर गाठून बिनविषारी धामण जातीच्या सापाला पकडले.
दुसऱ्या घटनेत सरकारी बगीच्या मागे वखारिया यांच्या घरामध्ये लांब विषारी नाग घरात शिरला. तोदेखील ‘लव्ह बर्ड’ला खाण्याच्या उद्देशाने आला होता. मात्र, तो पिंजऱ्यात अडकला. सर्पमित्र बाळ काळणे यांनी नागालादेखील पकडले. यापूर्वीसुद्धा कितीतरी विषारी, बिनविषारी साप ‘लव्ह बर्ड’ पक्षांच्या पिंजऱ्यात आढळले आहेत. अगदी दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावरील घरांमध्ये ‘लव्ह बर्ड’च्या पिंजऱ्यात साप पकडल्याचे बाळ काळणे यांनी सांगितले.
हेही वाचा – आपल्या देशाला ‘भारत’ नाव कशावरून पडले, त्याचे ‘इंडिया’ कसे झाले? वाचा
सापाला आपला भक्ष पक्षी असण्याचे दुरवरून कळते. या घरांच्या जवळपास असणारे साप भक्षाच्या वासाने घरातील पिंजऱ्यात येतात. ‘लव्ह बर्ड’ हे प्रेम व प्रतिष्ठा म्हणून काहीजण आपल्या घरात ठेवतात. मात्र, ते दरवाजा व खिडकीपासून दूर ठेवा. अन्यथा साप आला तर घरातील त्या जागेवर ठाण मांडेल, असे बाळ काळणे म्हणाले. ग्रामीण भागात कोंबडीचे व कबुतरांचे पिंजरेदेखील दूर ठेवावे. साप पक्ष्यांच्या अंड्याच्या वासाने येतात. पक्षी असलेल्या खाली पिंजऱ्यांचा वाससुद्धा बरेच दिवस राहतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन बाळ काळणे यांनी केले आहे.