बुलढाणा : माजी मंत्री तथा सिंदखेडराजा आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या येथील निवासस्थानी ‘त्याने’ अचानक ‘प्रगट’ होऊन सर्वांची घाबरगुंडी उडवून दिली. मग उपस्थितांनी ‘श्रीराम’चा धावा केल्यावर सर्वजण भयमुक्त झाले.
शीर्षक वाचून गोंधळून जाण्याचे काम नाही. कारण माजी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या घरी जेरबंद करण्यात आलेला कोणी गुंड वगैरे नसून तो अतिविषारी असलेला मण्यार जातीचा साप होता. या चपळ सापाला शिताफीने पकडणारे सर्पमित्र म्हणजे श्रीराम रसाळ होय. सरसर वेगाने जाणाऱ्या या सापावर नजर पडल्यावर उपस्थितांची तारांबळ उडाली. मनीष बोरकर व गणेश सनासे यांनी माहिती देताच रसाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपले कौशल्य व अनुभव पणाला लावून मण्यारला ‘बरणी बंद’ केले. त्याला नंतर जंगलात सोडून देण्यात आले.