डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या महादेव मंदिरालगतच्या नाल्यातील जलाशयामध्ये ‘ते’ दोघे प्रणय क्रीडेत रममाण झाल्याचे विलक्षण दृश्य ७ जुलैला सायंकाळी नजरेस पडले. अकोल्यातील निसर्गप्रेमींसाठी ती जलक्रीडा पर्वणीच ठरली. ‘ती’ जोडी होती सापांच्या धामण जातीची. नजरबंदी होणारा हा खेळ अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवला.
पावसामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात सकाळ-सायंकाळ असंख्य नागरिक भ्रमंती करीत असतात. साहित्यिक व ज्येष्ठ निवेदिका सीमा शेटे रोठे व त्यांचा महिलांचा समूह गुरुवारी सायंकाळी विद्यापीठातील महादेव मंदिर परिसरात फिरस्तीसाठी गेला होता. यावेळी नाल्यावरील पुलावरून त्यांच्या नजरेस एक अद्भूत दृश्य पडले. दोन साप अगदी एकमेकांमध्ये विळखा घालून मुक्तछंदपणे जलक्रीडा करीत होते. आधी धोडे लांब, मग झाडा आड, परत मध्यभागी, नंतर अगदी जवळ काठावर… असा हा दुर्मिळ विलक्षण खेळ अनेकांनी आपल्या डोळ्यात भरून घेतला. हे संपूर्ण दृश्य सीमा शेटे यांनी आपल्या मोबाइलमध्ये चित्रबद्ध केले.
सापांच्या या प्रणय क्रीडेविषयी असंख्य श्रद्धा-अंधश्रद्धा आहेत. ग्रामीण भाषेत याला सापांचा ‘लाग’ म्हणतात. काही समजुतीनुसार लाग पाहणे अशुभ मानल्या जाते. ग्रामीण भागामध्ये सापांच्या प्रणय क्रीडेवर कापड टाकले आणि ते धान्याच्या कोठीमध्ये किंवा शेतात ठेवले तर कायम समृद्धी राहते, अशी समज आहे. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यास अशा अद्भूत गोष्टी दृष्टीत पडतात. आम्ही भाग्यवान होतो म्हणून ती सर्पक्रीडा आम्हाला बघता आली, असे शेटे म्हणाल्या. हे दृश्य पाहून एका कविच्या ओळी ओठावर येतात…
धामण जातीच्या सापांची जलक्रीडा
‘‘नाशित मैथूनात मग्न, नग्न नागाच्या, विळख्यात स्तब्ध.’’
सापांचा प्रणय काळ
जून, जुलै आणि ऑगस्ट ही तीन महिने बहुसंख्या जातीतील सापांचा प्रणय काळ असल्याची माहिती सर्पतज्ज्ञ बाळ काळणे यांनी दिली. साप प्रणय क्रीडेत मग्न असताना दुरून ते दृश्य पाहावे, जवळ जाऊन त्यांच्या कार्यात व्यत्यय आणू नये, अन्यथा साप आक्रमक होऊन हल्ला करू शकतात, असे काळणे यांनी सांगितले.