लोकसत्ता टीम
बुलढाणा: घरात झोपलेल्या तरुणाला विषारी सापाने दंश केला अन् चार तासातच त्याचा मृत्यू झाला. गावातील तरुणाचा पाहता पाहता दुर्देवी अंत झाल्याने किन्ही- नाईक (ता. चिखली) गावावर आज शनिवारी शोककळा पसरली आहे.
अमडापूर पोलीस ठाणे हद्दीतील किन्ही- नाईक येथील महादेव डाकोरे (३०)हे गावाजवळ असलेल्या शेतात परिवारासह राहतात. आज १८ मार्चला सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते झोपेत होते. त्यांच्या डाव्या हाताला सापाने चावा घेतला. यामुळे ते जागे झाल्यावर हातातून रक्त निघत असल्याचे लक्षात आले. यामुळे नातेवाईकांनी त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . बुलढाणा शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.