वाशिम : वाईगोळ येथील आश्रम शाळेत २४० निवासी विद्यार्थी दाखवून परिपोषण अनुदान लाटले जात आहे. विद्यार्थ्यांना संतुलित आहार दिला जात नाही. यासह अनेक गंभीर प्रकार असताना संबंधित विभाग कुठलीच कारवाई करीत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते ऍड. श्रीकृष्ण राठोड आणि इंद्रजीत राठोड यांनी समाज कल्याण कार्यालयासमोर उपोषण पुकारीत २४० विद्यार्थी दाखवा अन १ लाखाचे बक्षीस मिळवा, असे थेट संचालक यांनाच आव्हान दिले आहे.
हेही वाचा >>> खर्चाचे दरपत्रक ठरले, त्यानुसारच खर्च करा; लोकसभा निवडणुकीसाठी…
मानोरा तालुक्यातील वाईगोळ येथील आश्रम शाळेत प्रशासक नेमवा, अशी मागणी जून २०२३ मध्ये करण्यात आली होती. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. इमाव बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या आदेशाचे अनुपालन तात्काळ करावे. आ. यापूर्वी प्रस्तुत आश्रमशाळेतील पदभरती रद्द ठरविल्याने अवैध जाहिरात काढणाऱ्या संस्था पदाधिकाऱ्यावर आश्रमशाळा संहितेमधील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावे, पदभरतीमधील कर्मचाऱ्यांची नावे तात्काळ आश्रमशाळेच्या कर्मचारी नोंदवहीमधून कमी करण्यात यावे. वसतिगृहात अनिवासी विद्यार्थ्यांनाच निवासी दाखवून परिपोषण अनुदान लाटत असल्याने त्याबाबत तात्काळ कारवाई करावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, याकरिता शाळा प्रमुखास, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडण्याकरीता बंधनकारक करावे व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नियमानुसार कारवाई करावी. प्रस्तुत आश्रमशाळेत तात्काळ आश्रमशाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यापरिषद स्थापन करावी. निवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता आदर्श दिनचर्येचे पालन करण्याबाबत वसतिगृह अधीक्षक यांना निर्देश द्यावेत.निवासी विद्यार्थ्यांना नियमानुसार संतुलित आहार देण्याची व्यवस्था करावी. यासह इतर मागण्यासाठी वारंवार तक्रारी, निवेदने देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने ऍड. श्रीकृष्ण राठोड व इंद्रजीत राठोड यांनी समाज कल्याण कार्याल्यासमोर उपोषण पुकारले असून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.