नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाच जोर चढला आहे. अद्यापही महायुती आणि महाआघाडीमधील काही जागांवरील तिढा कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोकसभेची तिकीट मिळवण्यासाठी अनेक उमेदवार पक्षांतर करतानाचे चित्र आहे. यात सत्ताधारी भाजप आघाडीवर आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये असणारे बडे नेतेही भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभेच्या या चढाओढीमध्ये समाज माध्यम मागे नाही. समाज माध्यमांवर भाजप प्रवेशाच्या अनेक मिम्सचा पाऊस सुरू आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांसमोर रामटेकवरून भाजपविरोधी खदखद
‘‘अरे ओ सांबा. काय चाललंय रामगडला? ठाकूर, जय वीरू, बसंती आणि तिची मावशी हे सगळे बीजेपीमध्ये गेलेत’’, ‘‘कार्यकर्त्यांना एक विनंती! दररोज प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी साहेब त्याच पक्षात आहेत का? याची दर तासाला अपडेट घेत जा’’, ‘‘सब भाजपा जायेंगे सिर्फ साहेब बचेंगे’’, ‘‘कालपासून घरातला बल्ब गेलाय, मग?, बीजेपीत तर गेला नसेल ना…’’ असे अनेक मिम्स सध्या समाज माध्यमांवर फिरत आहेत. महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण ४८ मतदारसंघ आहेत. २०१९ च्या निवडणुकीत या ४८ मतदारसंघांपैकी २३ जागांवर भाजप, १८ जागांवर शिवसेना आणि ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. उर्वरित तीनपैकी एका जागेवर काँग्रेसचा, एका जागेवर एआयएमआयएमचा आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन्ही पक्षांचे दोन-दोन गट पडले.
हेही वाचा : आश्चर्य! ‘या’ उमेदवाराकडे केवळ ५०० रुपयांची मालमत्ता, देशातील दुसरा सर्वात गरीब…
मूळ शिवसेनेच्या निवडून आलेल्या १८ खासदारांपैकी १३ खासदार एकनाथ शिंदेंच्या बाजूनं गेले. तर मूळ राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या ५ खासदारांपैकी १ खासदार अजित पवारांच्या बाजूने गेले. लोकसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, पक्षाकडून उमेदवारी मिळत नसल्याने अनेकांनी भाजपची वाट धरली आहे. तर काहींना भाजपही आपल्याकडे घेऊन उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर प्रचंड मिम्सचा पाऊस पडला आहे.