वर्धा : कोणत्याही ठिकाणी रिक्त जागा निघाल्या की बेरोजगार तरुणांची त्यावर झुंबड उडते. त्यात जर शासकीय खात्यात रिक्त जागा निघाल्या असतील तर मग गर्दी पाहायलाच नको. म्हणून रिक्त जागा भरण्यास निघालेल्या या खात्याने सावध राहण्याचा इशारा इच्छुकांना देऊन टाकला आहे. घडामोड आहे राज्याच्या समाजकल्याण खात्याची. या खात्याने विविध श्रेणीत २१९ जागा भरण्याचे ठरविले. त्यासाठी राज्यातून तब्बल १ लाख ८७ हजार २०२ उमेदवारांचे अर्ज आलेत. पूणे येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालयाने या जागांची जाहिरात काढली आणि त्यावर उड्याच उड्या पडल्यात.

वर्ग तीनच्या पदासाठी ही भरती आहे. भरती प्रक्रिया सूरू आहे. राज्यातील ५६ परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा पण सूरू झाली. १९ मार्चपर्यंत या परीक्षा चालतील. मात्र परीक्षा सूरू असतांना एक बाब वादग्रस्त ठरू लागली आहे. परीक्षेसाठी काही उमेदवार परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचत नसल्याच्या घटना घडत आहे. काही उशीरा पोहचले. त्यांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळावा म्हणून अधिकृत परीक्षा अधिकारी असलेल्या शासकीय प्रतिनिधी सोबत वाद घातला. हुज्जत घातली.

अनेक केंद्रावर तांडव झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर समाजकल्याण खात्याने आवाहन केले आहे. खात्याचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी परीक्षार्थिंनी वेळेतच केंद्रावर हजर राहण्याचे आज आवाहन केले. तसेच दिव्यांग उमेदवाराने अर्जात नमूद केल्यानुसार लेखणीक स्वतःच आणायचा आहे. खात्याकडून मिळणार नाहीच. सदर परीक्षा संगणक आधारित पद्धतीने तीन सत्रात आयोजित आहे. राज्यातील ५६ केंद्रावर रोज साधारण २२ हजार उमेदवार परीक्षा देत आहे. या भरतीत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल, गृहपाल महिला,समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंक लेखक या जागा भरल्या जाणार.

अशी भरती व त्यासाठी उसळलेली गर्दी यामुळे गैरप्रकार होण्याची भिती पण व्यक्त होते. म्हणून समाज कल्याण खात्याने सावधगिरीचा ईशारा दिला आहे. कोणत्याही अफवावार विश्वास ठेवू नये. कोणतीही व्यक्ती भरती प्रक्रियेत नोकरी देण्याचे किंवा परीक्षा पास करून देण्याचे आमिष देवू शकतो. असा अनुभव आल्यास या अमिषाला बळी पडू नये. ते आमिष मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा. असे सूचित करण्यात आले आहे.

Story img Loader