वर्धा : उच्च शिक्षण क्षेत्रात रॅगिंग हा शब्द परवलीचा होता. मात्र त्या विरोधात कठोर कायदा आला आणि रॅगिंगला बराच आळा बसला. पण तरीही रॅगिंग अद्याप पूर्णतः बंद झालेले नाहीच. कारण युजीसीने सूरू केलेल्या राष्ट्रीय रॅगिंग विरोधी हेल्पलाईनवर रॅगिंगच्या तक्रारी नोंदविल्या जात असतातच. २०२२ ते २०२४ या दरम्यान देशभरातून तक्रारी नोंदविल्या गेल्या. त्या आधारे सोसायटी अगेन्स्ट व्हॉइलेन्स इन एज्युकेशन ( सेव्ह ) या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात प्रामुख्याने ओडिशातील शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगच्या घटना घडण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे.
ओडीशातील एमकेसीजी मेडिकल कॉलेज बेहरामपूर विद्यापीठ हे देशातील रॅगिंग घटनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. वैद्यकीय शिक्षणात रायपूर येथील नेहरू मेमोरियल मेडिकल, बिहारचे वर्धमान, उत्तर प्रदेशातील तक्मिल उत तिब कॉलेज, नवी दिल्ली येथील मौलाना आझाद मेडिकल कॉलेज रॅगिंग मध्ये आघाडीवर आहेत. राज्यात नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे देशात रॅगिंग बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर तर राज्यात अव्वल असल्याची आकडेवारी आहे. रॅगिंगच्या सर्वाधिक म्हणजे ६१ तक्रारी या विद्यापीठात दाखल झाल्या आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या शिक्षणात अव्वल असलेल्या राज्यासाठी शोभनीय नसल्याचे म्हटल्या जाते. नशिकच्या आरोग्य विद्यापीठात २०२२ ते २४ दरम्यान रॅगिंगच्या ६१ तक्रारी दाखल झाल्यात.रॅगिंग मुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडत असतांना त्यास वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याचा सूर उमटतो. गत दशकात रॅगिंग विरोधी हेल्पलाईनवर आठ हजाराहून अधिक तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. या प्रत्यक्ष नोंद झालेल्या तक्रारी आहेत.
अनेकदा विविध तक्रारी थेट महाविद्यालय किंवा पोलीस ठाण्यात नोंदविल्या जात असतात. त्याची नोंद हेल्पलाईनवर होत नाही. प्रामुख्याने वैद्यकीय संस्थामध्ये रॅगिंगचे प्रमाण लक्षनीय असल्याची आकडेवारी आहे. इतर महाविद्यालयाच्या तुलनेत वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचे प्रमाण ३० पट अधिक असल्याची नोंद आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारी आहे. म्हणून विद्यापीठ संघटनानी आवाज उठविला पाहिजे, असे म्हटल्या जाते.
सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे हे म्हणाले की रॅगिंगला आळा बसावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राघवन समिती स्थापन झाली होती. या समितीच्या शिफारसी खरोखर मोलाच्या आहेत. त्या अंमलात आल्यास रॅगिंगवर नियंत्रण येऊन रॅगिंग फ्री कॅम्पस निर्माण होवू शकते. त्यासाठी आम्ही विद्यार्थी, पालक व प्राध्यापक यांचा समन्वय ठेवून काम करीत असतो.