अकोला: चंद्र पृथ्वीभोवती तर पृथ्वी सूर्याभोवती फिरतांना दोन्ही बाजूंनी एकारेषेत आल्यावर सूर्य-चंद्र ग्रहण होते. या माध्यमातून निसर्गातील सावल्यांचा खेळ बघण्याची संधी उपलब्ध होते. या महिन्यात १४ व २९ऑक्टोबरला सूर्य व चंद्र ग्रहण आहे. सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी चंद्रग्रहणाचा कोजागिरी पौर्णिमेला सव्वा तास अनुभवता येणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.
१४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. चंद्र जेव्हा पृथ्वीपासून अधिक अंतरावर असलेल्या स्थितीत असतो, तेव्हा पृथ्वीवरील फार कमी भागात आकाशात सूर्य बांगडी सारखा दिसतो. असा हा अनोखा आकाश नजारा उत्तर व दक्षिण अमेरिका परिसरात दिसणार आहे. आपल्याकडे या वेळी रात्र असल्याने भारतात हे ग्रहण दिसणार नाही. मात्र, २९ च्या पहाटे खंडग्रास चंद्र ग्रहणाचा लाभ कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सुमारे सव्वातास घेता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
हेही वाचा… अकोला: डॉक्टरची स्वत:वरच वार करून आत्महत्या; आजारपणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
चंद्र, सूर्य ग्रहणे आणि बुध, शूक्र अधिक्रमणे सुद्धा ग्रहणाच्या प्रकारात येतात आणि दीर्घ कालावधीसाठी स्मरणात राहतात. सूर्यग्रहण स्थितीत चंद्र आड आल्याने सूर्याचा काही अथवा पूर्ण भाग पृथ्वीवरून दिसेनासा होतो. सूर्यग्रहण अमावास्येला व चंद्रग्रहण पौर्णिमेला असते. भ्रमण कक्षेतील सव्वा पाच अंशांच्या फरकामुळे दर महिन्याला अशी स्थिती नसते. त्यामुळे ग्रहणे ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी पण वेगवेगळ्या वेळी दिसतात. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे सूर्यग्रहण दि. १४ चे रात्री ८.३३ वाजता प्रारंभ होऊन १५ चे पहाटे २.२४ पर्यंत राहील. पुढील वर्षी ९ एप्रिल व ३ ऑक्टोबर २०२४ ला सूर्य ग्रहणाचा योग जुळून येईल, असेही प्रभाकर दोड म्हणाले. सावल्यांच्या या खेळांसोबत पृथ्वीजवळ आलेल्या शनी व गुरु ग्रह दर्शनाचा लाभ रात्रीच्या प्रारंभी पूर्वेकडील आकाशात अतिशय चांगल्या पद्धतीने घेता येईल, असे देखील ते म्हणाले.