प्रबोध देशपांडे, लोकसत्ता
अकोला : पंतप्रधान सूर्योदय योजनेंतर्गत राज्यातील पावणेदोन लाख घरात सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने अकोल्यासह राज्यातील सात प्रमुख शहरांची निवड केली. प्रत्येक जिल्ह्यासाठी २५ हजार ग्राहकांचे लक्ष्य ठेवण्यात आले असून आगामी ३१ मार्चपर्यंत ते पूर्ण करण्याचे आव्हान महावितरणपुढे आहे.
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले. पंतप्रधानांनी सूर्योदय योजनेची घोषणा केली. या माध्यमातून देशात एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवला जाणार आहे. सौरऊर्जाद्वारे छतावरच वीजनिर्मिती होईल. या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांची निवड करण्यात आली. महावितरणद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी पुणे, नाशिक, लातूर, नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यांसाठी २५ हजार ग्राहकांचे लक्ष्य देण्यात आले आहे. महावितरणला ३१ मार्चपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करावे लागेल.
आणखी वाचा-फडणवीस गृहमंत्री असतानाही नोकरभरती घोटाळा, ‘आप’ ने केला सवाल
योजनेमध्ये सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केल्यास घरगुती वीज देयकात बचत होणार आहे. घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनांचा लाभ घेता येईल. एक ते तीन किलोवॅटपर्यंत ४० टक्के अनुदान मिळणार असून तीन किलोवॅटपेक्षाअधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान मिळेल. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत, परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट निवासी गृहनिर्माण संस्था ग्राहकांना २० टक्के अनुदान आहे. वापरानंतर शिल्लक वीज महावितरण प्रतियुनिटप्रमाणे विकत घेणार आहे. केंद्र सरकारकडून तीन किलोवॅटला प्रत्येकी १८ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होते. गृहनिर्माण संस्थांना सामायिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रत्येकी नऊ हजार रुपये अनुदान मिळते. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पावणेदोन लाख घरांत ‘सूयोदय’च्या माध्यमातून सौरऊर्जाचा प्रकाश पडणार आहे.
आणखी वाचा-लष्करप्रमुख जनरल मनोज पाण्डे शुक्रवारी नागपुरात, यांचा होणार सन्मान
अल्प आणि मध्यम उत्पन्नाच्या ग्राहकांवर भर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या योजनेचा लाभ अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या ग्राहकांना दिला जाणार आहे. दुर्गम भागातील घराघरात वीज पोहोचावी आणि वीज देयकाचा भार कमी होण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना राबवण्यात येत आहे.
राज्यात पंतप्रधान सूर्योदय योजना राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांची निवड केली. प्रत्येकी २५ हजार ग्राहकांचे लक्ष्य देण्यात आले. अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या ग्राहकांना प्राध्यान्याने लाभ दिला जाईल. -पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, महावितरण, अकोला.