अनिल कांबळे
नागपूर : युद्धाच्या काळात सैन्याच्या तुकड्यांना अनेक दिवस अन्नाशिवाय जगावे लागते. यावर उपाय शोधण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनेे (डीआरडीओ) संशोधन केले व ३०० ग्रॅम पाकिटात आठवडाभराचे अन्न साठवता येईल, केवळ पाण्यात बुडवून खाण्यायोग्य अन्न तयार करता येईल, असे अनेक प्रयोग यशस्वी झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात आयोजित १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये डीआरडीओच्यावतीने (डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरॅटोरी) प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्यात सैनिक आणि अंतराळात जाणाऱ्यांसाठी विशेष तंत्रप्रणालीचा वापर करून अन्न कसे तयार केले जाते, याबाबत माहिती देताना एक अधिकारी म्हणाले, सैनिकांची तीन ते चार दिवस जेवणाची व्यवस्था होईल, असे अन्न ‘डीएफआरएल’ने तयार केले असून टिफिन बॉक्सएवढ्या आकाराच्या पाकिटात असलेले अन्न विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात येते.
युद्धकाळात किंवा विशेष अभियानामध्ये परकीय सैन्यांशी दोन हात करताना सैनिकांना जेवण तयार करायला वेळच नसतो. कारण जेवण तयार केल्यास स्वयंपाकाचा धूर किंवा अन्नाच्या वासामुळे शत्रू सतर्क होऊ शकतो. त्यामुळे सैनिकाच्या पाठीवर असलेल्या पिशवीत अगदी ३०० ते ४०० ग्रॅम वजनाचे अन्नाचे पाकीट ठेवले जातात. त्यातील अन्न केवळ पाणी मिसळल्यास लगेच तयार होते. तसेच काही विशिष्ट प्रकारचे चॉकलेटसारखे तुकडे असतात. एका तुकड्यात २४ तास जगण्याची ऊर्जा असते. तसेच काही विशिष्ट प्रकारचे तांदूळ, आंब्याची पूड, चिकन-मटण बिर्याणी, व्हेज पुलाव, फुडबार, मटणबार, चिक्कीबार आणि अनेक खाद्यपदार्थ सैनिकाच्या पाठीवर असलेल्या पिशवीत असतात.
…असे तयार होते अन्न
सैनिकाच्या पाठीवर असलेल्या बॅगेत ‘थर्म ओ पॅन’ नावाची रासायनिक पदार्थ असलेली पिशवी असते. त्या पिशवीत खाद्यपदार्थ टाकला की तो आपोआप गरम होतो. चिकन बिर्याणीसाठी प्लास्टिकच्या पिशवीत फक्त पाणी टाकून ‘थर्म ओ पॅन’मध्ये ठेवली जाते. अवघ्या १० मिनिटात चिकन बिर्याणी तयार करता येते. फळाच्या रसासाठी काही ग्रॅम वजनाचे पाऊच ठेवले जातात. पाण्याचे छोटे पाऊच एकदा प्यायल्यास २४ तास तहान लागत नाही तर अन्नाचे एक पाकीट खाल्यास भूकही लागत नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> अखेर अंधार दाटलाच!, उमरेड, भिवापूरच्या बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित
अन्नपदार्थाचे गुणधर्म
वजनाने अगदी हलके असलेले अन्न तयार केले जाते. जास्त क्षमता आणि लगेच खाता येणारे असे अन्न तंत्रज्ञानाने तयार केले जाते. पिण्यास सोपे आणि पचनशक्ती वाढवणारे घटक अन्नात असतात. अधिक प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश या अन्नपदार्थात असतो. पाकिटातील अन्न एक वर्ष खराब होत नाही. त्यासाठी अन्नाला विशिष्ट वेष्टणात ठेवले जाते.