चंद्रपूर : महापालिकेने घनकचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याच्या प्रकल्पासाठी नागपुरातील विश्वेश हायड्रोटेक प्रा.लि. या कंपनीची निवड केली. मात्र या कंत्राटदार कंपनीने करारनामा पायदळी तुडवत मागील तीन वर्षांत एक मिलीग्राम खतदेखील तयार केले नाही. दरम्यान, राजकीय आशीर्वाद प्राप्त असलेल्या या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याऐवजी त्यास सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. या कंत्राटदारावर महापालिका अधिकारी वर्गाकडून एवढी कृपादृष्टी का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावर शहराच्या बाहेर महापालिकेचा घनकचरा डेपो आहे. शहरातील एकत्र होणारा ओला व वाळलेला कचरा या येथे एकत्र साठवला जातो. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन वर्षांपूर्वी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू केला जाईल, असे महापालिकेने घोषित केले होते. त्यातून निर्माण होणारे खत विक्री केले जाईल, त्यातून रोजगार आणि उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होईल, असाही दावा करण्यात आला होता.
हेही वाचा… सना खान हत्याकांडाबाबत भाजपचे मौन? फेसबुकवरील छायाचित्रांतून दांडगा जनसंपर्क समोर
त्यासाठी रितसर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार नागपुरातील एका बड्या राजकीय नेत्याच्या मुलाच्या विश्वेश हायड्रोटेक प्रा. लि. या कंपनीला घनचकऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कंत्राट देण्यात आले. २८ मे २०२० रोजी या कामाचा कार्यादेश निघाला. महापालिकेने कंपनीशी करार करताना दररोज १४० ते १४५ मे. टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. आज या कराराला तीन वर्षे झाले तरी आजतागायत हे काम सुरू झाले नाही. आतापर्यंत तब्बल चार वेळा कंपनीला मुदवाढ देण्यात आली. या काळात महापालिकेने कंत्रादाराला कारणे दाखवा नोटीस बजावली.
हेही वाचा… ‘…तर मंत्रालयात विष प्राशन करू’, अंबुजा प्रकल्पग्रस्तांचा शासनाला निर्वाणीचा इशारा
पुन्हा आता १३ जून २०२३ रोजी एक पत्र महापालिकेने पाठविले. नोटीस मिळताच तीन दिवसांच्या आत उत्तर सादर करा, असे या पत्रात बजावण्यात आले.