पर्यावरण आणि मानवी जीवनालाच धोका
पर्यावरण – भाग १
प्रगती आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना माणसाला अनेक गोष्टींशी तडजोड करावी लागते. नागपूर शहर हे आज राज्याची उपराजधानी म्हणून मिरवत असले आणि आता स्मार्ट सिटीच्या वाटेवर असले तरीही घनकचऱ्याचे मोठे आव्हान आज या शहरासमोर आहे. एक दोन नव्हे, तर तब्बल १ हजार मेट्रीक टन कचरा दररोज या शहरातून गोळा केला जातो. मानवनिर्मित हा कचराच आज पर्यावरणासाठी आणि पर्यायाने माणसाच्या आयुष्यासाठी घातक ठरला आहे.
गेल्या २०११ च्या जनगणनेनुसार नागपूरची लोकसंख्या २५ लाखाच्या आसपास होती, पण आज ती सुमारे ४० लाख असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो. ही लोकसंख्या दररोज १ हजार मेट्रीक टन कचरा तयार करते. नागपूर महापालिकेचा ‘स्टेटस रिपोर्ट’ तयार असला तरी प्रसिद्ध व्हायचा आहे, पण या अहवालाच्या अंदाजानुसार ११०० मेट्रीक टन एवढे कचऱ्याचे प्रमाण गेले आहे. भांडेवाडी येथील कचरा प्रक्रिया केंद्रात संपूर्ण शहराचा कचरा गोळा होतो आणि त्यातील केवळ १५० ते २०० मेट्रीक टन कचऱ्यावरच प्रक्रिया केली जाते. उर्वरित ८०० ते ९०० मेट्रीक टन कचरा तसाच पडून राहतो. त्यामुळे पर्यावरणासाठी आणि पर्यायाने नागरिकांच्या आरोग्यावर तो परिणाम करत आहे. हंजर बायोटेक कंपनीकडे या कचरा प्रक्रिया केंद्राची जबाबदारी आहे. ही कंपनी कचऱ्याचे सेग्रीगेशन करून कचऱ्यापासून खतनिर्मिती करून ती शेतकऱ्यांना विकते. याच कचऱ्यातील प्लास्टिकचा पुनर्वापर केला जातो, तर उर्वरित कचऱ्यापासून ज्वलनशील पदार्थ तयार केला जातो. मात्र, १४ फेब्रुवारी २०१२ ला भांडेवाडीतील या केंद्राला आग लागली आणि या केंद्रातील सेग्रीगेशन युनिट खराब झाले. तेव्हापासून आजतागायत या युनिटमध्ये सुधारणा झालेली नाही. त्यामुळे एकूण कचऱ्यापैकी केवळ १५० ते २०० मेट्रीक टन कचऱ्यावरच प्रक्रिया केली जाते आणि उर्वरित कचऱ्याची निव्वळ साठवणूक केली जाते.
स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत घनकचऱ्याची अशी अवस्था मान्यच नाही. भांडेवाडीतील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या या केंद्राचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. याच केंद्राला पुनरुज्जीवित करून किंबहुना त्याहीपेक्षा नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या व्यक्तिच्या हातात ते देऊन पर्यावरण हानीला आळा घालता येईल. विदेशात कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाते. एवढेच नव्हे, तर बायोइथेनॉलही तयार केले जाते. घनकचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती होऊ शकते आणि यात मिथेनचे प्रमाण ५५ ते ६५ टक्के असते. या मिथेनपासूनही वीज निर्मिती सहज शक्य होते. त्यामुळे स्मार्ट सिटीत या नव्या संकल्पना अंमलात आणण्याची आणि राबवण्याची तेवढीच नितांत गरज आहे.
हे नागपूर की कचरापूर?
कचऱ्याची नागपुरातील अवस्था भयंकर आहे. एका खासगी कंपनीला शहरातील कचरा गोळा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ती कंपनी त्यांचे कर्तव्य पार पाडत असली तरीही नागरिकांच्या जबाबदारीचे काय? शहरातील कचऱ्याची ही अवस्था पाहून हे नागपूर की कचरापूर, असे वाटायला लागते. नागरिक स्वत:चे घर स्वच्छ ठेवून कचरा बाहेर फेकतात. स्मार्ट सिटीत पर्यावरण संरक्षणासाठी जे करायला पाहिजे ते सर्व करावे. आज पर्यावरण शिकवावे लागते, याचे जास्त दु:ख आहे. मूल्यांचा पाठ घ्यावा लागतो, हे दु:खदायक आहे. आधी ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जात होते. आपण स्वत:ला जसे जपतो, तसे वातावरणाला जपायला पाहिजे, तरच स्मार्ट सिटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल.
प्रा. मनीषा महात्मे, सेंट जोसेफ कनिष्ठ महाविद्यालय
घनकचरा हेच मोठे आव्हान
शहरातील घनकचरा हे आज मोठे आव्हान आहे. विभागवार कचऱ्याचे मोठे डबे लावण्यात आले आहेत, पण कचरा आत कमी आणि बाहेरच अधिक, अशी अवस्था आहे. शहरासाठी हे चित्र अतिशय घातक आहे. कारण, त्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणामही तेवढेच आहेत. महापालिकेने खासगी कंपनीला कंत्राट देताना त्यांच्याकडून व्यवस्थित काम होत आहे किंवा नाही, याकडे लक्ष देणेही तेवढेच गरजेचे आहे. खासगी कंपनीला काम दिले म्हणजे जबाबदारी झटकून चालणार नाही.
योगिता चौधरी, सोनेगाव