नागपूर: मोसमी पावसाने राज्यातून ‘एक्झिट’ घेतली, पण अवकाळी पाऊस पाठ सोडायला तयार नाही. पुढील २४ तासांसाठी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अवकाळीने जोर धरल्यामुळे आता राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. भरीस आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळं आता या संकटातून सावरण्याचेच प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील हे अवकाळीचं वातावरण आणखी काही दिवसांसाठी कायम राहणार आहे. येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली असून, याच धर्तीवर ‘यलो अलर्ट’ही देण्यात आला आहे. काही भागांमध्ये वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
हेही वाचा… मनोज जरांगेंची अकोला चरणगावमध्ये सभा; पश्चिम विदर्भात ४ व ५ डिसेंबरला दौरा
सध्याच्या स्थितीत अरबी समुद्राच्या नैऋत्येपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होताना दिसत आहे. ज्यामुळे अवकाळी इतक्यात पाठ सोडणार नसल्याचे चित्र सध्या आहे. दरम्यान, राज्यात सध्या मान्सूनने माघार घेतली असली तरीही अवकाळी पावसाचे थैमान सुरुच आहे. ज्यामुळे जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदियामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामानात बदल होत असून कमाल आणि किमान तापमानात चढउतार दिसून येत आहे. दरम्यान, येतया एक डिसेंबरदरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा एकदा मोठे बदल होण्याची शक्यता आहे.