गडचिरोली : शून्य सावली दिवसाबद्दल आजही अनेकांच्या मनात कुतूहल आहे. कारण या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही वेळासाठी आपल्याला सोडून जाते. मे महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात देखील काही गावातील लोकांना शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५०° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दररोज ०.५० ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो,त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात अनुभवता येतो.
महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० ° अंशावरून कर्कवृत गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल,काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही. आपण दुपारी १२.०० ते १२.३५ या वेळेदरम्यान सूर्य निरीक्षण करता येणार. गडचिरोलीतील सिरोंचा, कोपेला,अमरावती, कामातूर येथे १५ मे रोजी दुपारी १२.५ मि., जिमलगट्टा येथे १६ मे दुपारी १२.५, अहेरी, हेमलकसा, आलापल्ली १७ मे दुपारी १२.४, एटापल्ली, मुलचेरा १८ मे १२.५, घोट चामोर्शी १९ मे १२.६, जिरमतारी २० मे १२.५, गडचिरोली, लेखामेंढा २१ मे १२.५, आरमोरी २२ मे तर देसाईगंज आणि कुरखेडा येथे २३ मे रोजी दुपारी १२.७ मिनिटांनी शून्य सावली अनुभवता येणार आहे.
शाळा,महाविद्यालयात आणि नागरीकांसाठी विज्ञान आणि भूगोल शिक्षकांनी हा उपक्रम राबवावा आणि प्रात्यक्षिक रूपाने विध्यार्थ्यांना ही माहिती द्यावी
सुरेश चोपणे, अध्यक्ष स्काय वॉच गृप, चंद्रपूर