अकोला: जिल्ह्यातील काही गावांना हिवाळ्यातच पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठीच्या पाणीटंचाई आराखड्यानुसार आठ गावांमध्ये १९ लाख ६२ हजार रुपये निधीतून १२ उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
यंदा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला. त्यामुळे सिंचन प्रकल्पात अपेक्षेनुसार पाणीसाठा उपलब्ध नाही. अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यानुसार टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले. पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा कृती आराखडा मंजूर केला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचा समितीत समावेश आहे. ही कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अकोला तालुक्यातील चार गावांचा समावेश असून, एक विहीर अधिग्रहण, एक नळयोजना विशेष दुरुस्ती व सहा कूपनलिका अशा १५ लाख ५४ हजार निधीतून एकूण आठ कामे केली केली जातील. बार्शिटाकळी तालुक्यातील एका गावाचा समावेश असून, एक विहीर अधिग्रहण व एक विंधनविहीर अशी दोन कामे, तर बाळापूर तालुक्यात दोन गावांचा समावेश असून, एक विहीर अधिग्रहित करण्यात येणार आहे. पातूर तालुक्यात एका गावात एका विंधनविहिरीचा प्रस्ताव आहे. चालू तीन महिन्यांच्या कालावधीत मूर्तिजापूर, अकोट व तेल्हारा तालुक्यात एकही उपाययोजना प्रस्तावित नाही.