नागपूरमध्ये खासदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध गायक मोहित चव्हाण यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या क्रार्यक्रमाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तिकीट मिळाले नसल्यामुळे अनेकांना परत जावे लागले. सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे बाहेर काही काळ गोंधळ झाला. युवकांची गर्दी झाली. त्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली. गर्दीमुळे अनेकांचे मोबाईलही हरवले. प्रवेशद्वाराच्या बाहेर गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यात चार-पाच युवक जखमी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटणे नैसर्गिक – डॉ. सुरभी मित्रा

‘मस्सकली’, ‘अभी कुछ दिनों से लग रहा है’, ‘सुरमई शाम’ सारख्या गीतांना सादर करून सुप्रसिद्ध गायक मोहित चव्हाण यांनी तरुणाईची मने जिंकली. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर हजारोच्या संख्येने उपस्थित तरुणाईने कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारी थाटात समारोप झाला. दहाव्या दिवशी लोकप्रिय गायक मोहित चव्हाण यांच कार्यक्रम सादर झाला. तरुणाईने कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. मैदानाबाहेरही हजारोंच्या संख्येने तरुणांनी कार्यक्रमाचा एलएडी स्क्रीनच्या माध्यमातून आस्वाद घेतला. मोहितने ‘जो भी मै कहना चाहूं’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली व हा भव्य महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी गडकरी यांचे आभारी मानले.

हेही वाचा- रानटी हत्तींची भंडारा जिल्ह्यातून एक्झिट; परतीच्या दिशेने प्रवास सुरू

‘ये दुरिया, राहो की दुरिया’ या गीतानंतर ‘अभी कुछ दिनों से लग रहा है’ हे गाणे सादर केले. नंतर ‘मस्सकली’ या गीताने तरुणाईची मने जिंकली. मोहितने सादर केलेल्या ‘सुरमई शाम आती है’ या गीताच्या सुरात सूर मिसळत तरुणाईने ताल धरला. या गाण्याला वन्समोअर मिळाला. ‘तेरे संग ईश्क’ यासारखी अनेक लेाकप्रिय गीते सादर करून मोहितने युवकांना थिरकायला लावले. कार्यक्रमाला गडकरी यांच्यासह आमदार आशीष जयस्वाल, आमदार प्रवीण दटके, प्रशांत रहाटे, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, डॉ. संजय उगेमुगे, माजी खा. डॉ. विकास महात्मे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा- नागपूर: पंतप्रधानांचा तिकीट घेऊन मेट्रो प्रवास, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

दररोज होणाऱ्या ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ या कार्यक्रमात ४०० कलावंतांनी गीते सादर केली. त्यातील काही कलावंतांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार जयप्रकाश गुप्ता यांनी मानले. हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी गजरात शिवशाही ढोलताशा पथकाने ढोलताशा वादन करीत वातावरणात जोश भरला. पराग बागडे, अमीत पांडे व जय आसकर यांच्या नेतृत्वातील भगवा फेटा परिधान केलेल्या १५० युवक-युवतींनी दमदार वादन केले आणि वातावरण शिवमय झाले. तत्पूर्वी, प्रसिद्ध गायक अमर कुळकर्णी यांच्या नेतृत्वातील संस्कार भारतीच्या चमूने राष्ट्रभक्तीचा जागर केला. कार्यक्रमाचे निवेदन स्मीता खनगई यांनी केले.

ज्येष्ठ नागरिकांसाठीही महोत्सव

यंदाच्या महोत्सवात ५ हजार कलाकारांनी आपली कला सादर केली. नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल नितीन गडकरी यांनी नागपूरकरांचे आभार मानले. क्रीडाप्रेमींसाठी खासदार क्रीडा महोत्सव लवकरच सुरू होणार असून यावर्षी ज्येष्ठ नागरिकांकरितादेखील तीन दिवसांचा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some youths were injured in police lathi charge on the last day of the mp festival in nagpur vmb 67 dpj