नागपूर: आईवरी वैद्यकीय उपचार घेऊन घराकडे परत जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर धडकली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या उभ्या ट्रकवर आदळली.
या विचित्र अपघात मायलेक जागीच ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवारी दुपारी दीड वाजता आठवा मैल चौकात झाला. रजनी सुभाष गिरनाळे (५०, रा.रत्नापूर, कापूसतळनी. ता. अंजनगाव सूर्जी. जि. अमरावती), अक्षय गिरनाळे (२८) अशी अपघातात ठार झालेल्या मायलेकांची नावे आहेत. तर श्रद्धा गिरनाळे (२०) असे जखमी मुलीचे नाव आहे.
हेही वाचा… गडचिरोली: वनपरिक्षेत्र अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात; ७२ लाखांचा दंड कमी करण्यासाठी मागितले १० लाख
रजनी गिरनाळे या शेतकरी असून पतीच्या निधनानंतर त्या मुलगा अक्षय, मुलगी श्रद्धा यांच्यासह राहत होत्या. मुलगा अक्षय अभियंता असून आईला शेतीकामात मदत करीत होता. मुलगी श्रद्धा ही बी.एस्सीचे शिक्षण घेत आहे. रजनी यांना वाताचा आजार असून त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होता.
गुरुवारी दीड वाजता वैद्यकीय उपचार घेऊन गिरनाळे कुटुंब परत जात होते. अक्षय हा कार चालवित होता. आठवा मैल चौकात अक्षयचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकली. कार हवेत उडून दुसऱ्या मार्गावर गेली. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकवर कार आदळली. त्यामुळे कार चक्काचूर झाली. कारमध्ये बसलेल्या रजनी आणि अक्षयचा जागीच मृत्यू झाला तर श्रद्धा गंभीर जखमी झाली. वाडीचे ठाणेदार प्रदीप रायन्नावार हे लगेच घटनास्थळावर पोहचले. या प्रकरणी जखमी श्रद्धा हिच्या जबाबानंतर पुढील अपघाताची नोंद घेण्यात येणार आहे.