यवतमाळ : शेतीच्या वादातून मुलाने चाकुने गळा चिरून वडिलांची हत्या केली. ही घटना कळंब तालुक्यातील मेंढला या गावी, गुरूवारी पहाटे घडली. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी २४ तासाच्या आत मारेकरी मुलास अटक केली. या घटनेने मेंढला गावात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुभाष झोलबाजी चौधरी  (५२) रा. मेंढला ता. कळंब असे मृतकाचे नाव आहे. तर प्रफुल्ल सुभाष चौधरी (२४) रा. मेंढला असे आरोपीचे नाव आहे. वडील सुभाष चौधरी यांनी आरोपी प्रफुल्ल चौधरी याच्या नावावर अडीच एकर शेती करुन दिली होती.

मात्र तो शेती करीत नसल्याने शेती आपल्या नावावर करून दे, असा तगादा वडिलांनी लावला होता. यावरुन वडील सुभाष व मुलगा प्रफुल्ल यांच्यात वाद सुरू होता. बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी घरात सर्व जण झोपी गेल्यानंतर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपी प्रफुल्ल याने चाकूने वडिलांच्या गळ्यावर वार केले.

यावेळी त्यांनी आरडा ओरड केल्याने दुसरा मुलगा व मुलगी जागे झाले. त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला. गळा चिरल्याने सुभाष चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. शेत जमीन नावावर करण्याच्या वादातून झालेल्या या वादात वडिलांना जीव गमवावा लागल्याने चौधरी कुटुंबाला धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

मृतकाचा लहान मुलगा प्रवीण सुभाष चौधरी (२१) रा. मेंढला याने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी मोठा भाऊ प्रफुल्ल चौधरी याच्या विरूद्ध वाद घालून वडिलांना ठार केल्याची तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी प्रफुल्ल सुभाष चौधरी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

वडिलांचा गळा चिरून खून केल्यानंतर घरातील सदस्य जागे झाल्याने घाबरलेल्या प्रफुल्लने घटनास्थळाहून पळ काढला. मेंढला गावातून तो फरार झाला व गावाच्या परिसरात मादणी, बोरगावच्या जंगलात लपून बसला. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी पहाटेपासून जंगलात त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी तो मादणीच्या जंगलात आढळला. ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

या घटनेने मेंढला गावात खळबळ उडाली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत कावरे, पोलीस उपनिरीक्षक वसंत शिंदे, गजानन शेजुलकर, कैलास लोथे, रुपेश नेवारे, संदीप मेहत्रे, अरविंद वाघाडे यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son kills father by slitting his throat with a knife over a farming dispute nrp 78 zws