चंद्रपूर : राज्यात जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी संपावर गेले असताना व जिल्हा परिषद अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ६ हजार ७५० कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर रुजू होण्याची नोटीस बजावली असताना येथील शासकीय कार्यक्रमात ‘जुनी पेन्शन योजना लागू करा’ हे गीत गाजले. शासकीय कार्यक्रमातील या गिताची चांगलीच चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून चांदा क्लब ग्राउंड येथे विभागीय सरस व हिराई महोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमाला आमदार प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे उपस्थित होते.
या महोत्सवात रविवारी सास्कृतिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका संचाने पेन्शन दे पेन्शन दे हे गीत सादर केले. शासकीय कार्यक्रमात सादर झालेल्या या गिताची चांगलीच चर्चा आहे. या गितासोबतच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, असाही नारा देण्यात आला.