नागपूर: विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन म्हटले की, सर्वात प्रथम डोळ्यापुढे येतात ते यानिमित्ताने निघणारे मोर्चे. बेरोजगारांना नोकरी हवी असते, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम व्हायचे असते व सेवेत असणाऱ्यांना पगावरवाढ हवी असते, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव हवा असतो. अशा कितीतरी विविध मागण्यांसाठी रोज अनेक मोर्चे विधानभवनावर धडकत असतात. शुक्रवारी शेतकरी पुत्रांनी काढलेल्या मोर्चाची मागणी मात्र आगळीवेगळी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतमालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी पुत्रांना लग्नासाठी मुली मिळत नाही. त्यामुळे शेतमालाला भाव द्या, या मागणीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांचे लग्नाळू तरुण शुक्रवारी विधानभवनावर धडकले. त्यांच्या हाती असलेले फलक लक्षवेधी होते. “माझ्या शेताला भाव मिळत नाही, म्हणून मला लग्नासाठी मुली मिळत नाही”, “मला शेतीसाठी.. वीज पंपासाठी वीज मिळत नाही… अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळत नाही… तरीही ताठ मानेनं शेती. पण माझ्या शेतमालाला भाव मिळत नाही. पैशा अभावी जगता येत नाही, लग्नाशिवाय मरता येत नाही , काय करू? – एक लग्नाळू शेतकरी ”, असे फलक तरुणांच्या हाती होते. शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल व तरुण मुलांना लग्नासाठी मुलगी देण्यास वधुपिता तयार होईल, हे सांगण्याचा प्रयत्न या मोर्चाव्दारे करण्यात आला.

हेही वाचा – गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

हेही वाचा – आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ, शिंदे गटातील आमदार म्हणाले…

नागपूरच्या रस्त्यावरून हा मोर्चा जात असताना त्यांच्या हातातील फलकांकडे नागपूरकर कुतुहलाने बघत होते. हे सर्व तरुण सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्यांची पार्श्वभूमीही शेतकरी आंदोलनाची आहे. ते स्वंयस्फुर्तीने शेतकऱ्यांचे प्रश्न आगळ्यावेगळ्या पद्धतीने मांडण्यासाठी नागपूरमध्ये आले. यानिमित्ताने शेतकरी पुत्रांची ही सामाजिक समस्या ऐरणीवर आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sons of farmers reached nagpur vidhan bhavan why cant we get a girl for marriage they gave reason cwb 76 ssb
Show comments