यवतमाळ : केंद्र सरकारचे शेतीविषयक धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडाणी, अंबानींसारख्या मित्रांना जगातील श्रीमंतांच्या यादीत नेऊन बसविले तर दुसरीकडे देशातील शेतकऱ्यांना मात्र लाचार बनविले, अशी टीका काँग्रेसचे राज्य सरचिटणीस देवानंद पवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे आज गुरुवारी सोटा मोर्चा काढण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने लाखो हेक्टर शेतातील पिके मातीमोल झाली आहेत. सरकार मात्र राज्यात एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगत आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात एक लाख २५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी गांजा पिऊन नुकसानीची पाहणी करतात काय, असा प्रश्न देवानंद पवार यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्ष यात्रा, जुन्या पेंशनसाठी मोर्चा एकाच दिवशी; १२ डिसेंबरला पोलिसांची कसोटी

अतिवृष्टीने कापूस, सोयाबिन, तुरीचे प्रचंड नुकसान झाले. सरकार मात्र पीक विमा कंपनीसोबत साटेलोटे करुन त्यांचे एजंट बनून मलिदा लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पवार यांनी केला. सरकारने फक्त ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. इकडे आपल्या राज्यात शेतकरी मरत असताना सत्ताधारी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. मंत्रालय, विधानभवन पुर्नविकास कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची तयारी केली जात असताना दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून कसे वंचित करता येईल, याचीही व्युहरचना आखली जात असल्याचा आरोप पवार यांनी केला.

हेही वाचा – राष्ट्रपती दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहेत कार्यक्रम?

यवतमाळ जिल्ह्यात हलाखीच्या परिस्थितीने शेतकरी आत्महत्या करीत आहे तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र आपल्या मुलाच्या हट्टापायी महागड्या गाड्यांचे प्रदर्शन भरविण्यात अधिक रस दाखवितात, ही दुदैवी बाब असल्याची टीकासुद्धा देवानंद पवार यांनी केली. हातात सोटे घेतलेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा दुपारी १ वाजता गिलाणी महाविद्यालयापासून निघून तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर, शैलेश इंगोले, अध्यक्ष घाटंजी तालुका काँग्रेस कमिटी, संजय डंभारे अध्यक्ष घाटंजी तालुका किसान काँग्रेस, प्रा. विठ्ठल आडे यांच्यासह हजारोंच्या संख्येत शेतकरी सहभागी झाले होते. तहसीलदार शेलवटकर यांनी मोर्चास्थळी येऊन निवेदन स्वीकारले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sota morcha was held in ghatanji today on thursday for various demands of farmers nrp 78 ssb
Show comments