नागपूर : दक्षिण आफ्रिकेतील प्राणी कल्याणकारी नेटवर्क असलेल्या ‘वाईल्डलाईफ अॅनिमल प्रोटेक्शन फोरम ऑफ साऊथ आफ्रिके’ने रिलायन्स समूहाच्या गुजरात राज्यातील ‘वनतारा’ या ‘ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’मध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्या, चित्ता, वाघ आणि सिंहांची निर्यात होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

२६ फेब्रुवारी २०२४ ला ‘वनतारा’ची ओळख जगासमोर आली. त्यानंतर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव दिनानिमित्त त्याचे उद्घाटन केले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील वन्यजीव अभ्यासकांनी ‘वनतारा’च्या जागेबद्दल आणि त्याठिकाणी असलेल्या प्राण्यांबद्दल चिंता व्यक्त केली. गुजरातमधील तीन हजार एकर क्षेत्रफळात ‘वनतारा’ स्थापित करण्यात आले आहे आणि देशातील कोणत्याही भागापेक्षा हे ठिकाण अतिशय उष्ण आहे. तसेच याठिकाणी असलेल्या अनेक प्रजातींसाठी ते योग्य नाही. यासंदर्भात त्यांनी सहा मार्चला संबंधित मंत्रालयाला पत्र लिहून चिंता व्यक्त केली.

यात दक्षिण आफ्रिकेचा वनीकरण, मत्स्यव्यवसाय व पर्यावरण विभाग, वन्यप्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारावरील दक्षिण आफ्रिकन कन्व्हेन्शन व्यवस्थापन प्राधिकरण (साईट्स), दक्षिण आफ्रिकन वैज्ञानिक प्राधिकरणाचे अध्यक्ष टी फ्रँट्झ आणि साईट्स सचिवालय यांचा समावेश आहे.

Story img Loader