अमरावती : एअर इंडियाच्या सहकार्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. एमएडीसीने जागतिक दर्जाच्या विमान उड्डाण पायाभूत सुविधांनी सुसज्ज अमरावती विमानतळावर एअर इंडिया एप्रिल-मे २०२५ पर्यंत उड्डाण ऑपरेशनसह प्रकल्प पूर्णतः कार्यान्वित करण्याची शक्यता आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालकांच्या वतीने परवानाकृत उड्डाण प्रशिक्षण संस्था (फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन) ही भारतातील कोणत्याही विमान कंपनीने स्थापन केलेली पहिली संस्था राहणार आहे.
या सहयोगी उपक्रमासाठी एअर इंडिया आणि एमएडीसी यांच्यात एक सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. एअर इंडियाचे संचालक सुनील भास्करन, एअर इंडियाच्या एव्हिएशन अकादमी यांच्या नेतृत्वाखालील एक चमू अमरावतीमध्ये या प्रकल्पाच्या भूस्तरीय योजनांचे रेखाटन करत आहे.
एअर इंडिया ३१ सिंगल इंजिन आणि तीन ट्विन इंजिन विमानांद्वारे दरवर्षी १८० व्यावसायिक वैमानिकांना प्रशिक्षण देणार आहे. दरवर्षी ३६ हजार फ्लाइट तासाची क्षमता या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांसाठी १० एकर जमिनीवर अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था विकसित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये डिजिटल-सक्षम वर्ग, जागतिक शैक्षणिक मानकांसह सुसज्ज वसतिगृहे, एक डिजिटल ऑपरेशन सेंटर आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्वतःची देखभाल सुविधा उपलब्ध असणार आहे. उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या सर्वसमावेशक प्रशिक्षण अभ्यासक्रमात सैद्धांतिक वर्ग, तसेच गतिमान व्यावहारिक उड्डाण अनुभवाचा समावेश असणार आहे. येथे देशातील तरुणांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळेल.
एमएडीसीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे म्हणाल्या, या प्रकल्पामुळे केवळ विदर्भातील आर्थिक संभाव्यतेला चालना मिळणार नाही तर महाराष्ट्रातील विमान वाहतूक क्षेत्राला चालना मिळणार आहे.
एमएडीसी रात्रकालीन उड्डाण आणि इन्स्ट्रुमेंटल लँडिंग क्षमतेसह अत्याधुनिक विमानचालन सुविधा सुरू करणार आहे. यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात ३ हजारांहून अधिक नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
अमरावती विमानतळावर उड्डाण करण्यासाठी ३०० दिवसांपेक्षा जास्त स्वच्छ दृश्यमानता, जागेची उपलब्धता, एमएडीसीने उभारलेली जागतिक दर्जाची धावपट्टी, रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याच्या क्षमतेने सुसज्ज असलेले विमानतळ ही वैशिष्ट्ये आहेत. अमरावती विमानतळ हे महाराष्ट्रातील उडान-आर. सी. एस. योजनेत समाविष्ट असलेल्या विमानतळांपैकी एक आहे. अमरावती अलायन्स विमान सेवेने लवकरच मुंबईशी जोडले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता या ठिकाणी दक्षिण आशियातील सर्वात मोठी विमान उड्डाण प्रशिक्षण संस्था उभारली जात आहे. – गौरव उपश्याम, वरिष्ठ व्यवस्थापक, अमरावती विमानतळ