नागपूर : तुम्ही जर चांगल्या रोजगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. हल्ली नागपूरच्या मिहानमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. अनेक विदेशी कंपन्या गंतवणूक करीत आहेत. त्याचा फायदा आपल्याला घेता येणार आहे. नुकतीच दक्षिण कोरीयन या कंपनीने सतराशे कोटींची गुंतवणूक केली असून शकडो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि दक्षिण कोरियाच्या एच एस ह्युसंग ऍडव्हान्स्ड मटेरिअल्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाक यांग सीआँग यांच्यामध्ये बुटीबोरी, नागपूर येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादनासंदर्भात १७४० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला.

सदर करारानुसार एच एस ह्युसंग कॉर्पोरेशनकडून बुटीबोरी, नागपूर येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादन प्रकल्पासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकूण १७४० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे ४०० स्थानिक रोजगारसंधी निर्माण होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, ह्युसंग कंपनी नागपूरच्या बुटीबोरी येथे नवा अध्याय सुरू करत असून, कंपनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसोबतच आता नागपुरात आपल्या कार्याचा विस्तार करत असल्याचे पाहून आनंद होत आहे. महाराष्ट्रात यापुढेही अनेक प्रकल्प गुंतवणुकीसाठी पुढे येत राहतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रधान सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एच एस ह्युसंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

मिहानमध्ये रोजगारची संधी

मिहानमधील बहुतप्रतीक्षित पतंजली फूड व हर्बल पार्क सुरू होण्यास अखेर मुहूर्त सापडला असून येत्या ९ मार्चला या प्रकल्पातून उत्पादनास सुरुवात होत आहे. संत्रा, मोसंबी, कोरफड, कडूलिंब, लिंबू, आवळा आणि इतर औषधी वनस्पतीसह इतर कच्चामाल पतंजली प्रकल्प येथील शेतकऱ्यांकडून विकत घेणार आहे. या प्रकल्पातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विदर्भातील ५० हजारपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे. कच्च्या व तयार झालेल्या मालाची वाहतूक, पॅकेजिंग प्रक्रिया यातून मोठी रोजगार निर्मिती होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० सप्टेंबर २०१६ मध्ये पतंजलीच्या फूड प्रोसेसिंग प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते.

मिहानमध्ये या समूहाला २६५ एकर जमीन अल्पदरात देण्यात आली आहे.या प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळेल आणि युवकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन आठ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु उत्पादनास सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकरी आणि युवकांची घोर निराशा झाली आहे. अखेर या प्रकल्पातून उत्पादनास पुढील महिन्यात सुरुवात होईल, असे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पात कंपनी सुमारे १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दररोज ८०० ते ९०० टन संत्र्याची आवक होणार आहे.

Story img Loader