चंद्रपूर: उशिरा दाखल झालेल्या मोसमी पावसाने गेल्या काही दिवसांपासून ओढ दिल्यामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. काही जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, आता पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ ८८ मिमीच पाऊस झाल्याने ४ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. अवघ्या ६५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहेे.
धान, सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांच्या पेरण्या पावसाशिवाय होणार नाही, यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहे.
जिल्ह्यात केवळ २१ महसूल मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, आता पावसाने उसंत घेतली आहे. जिल्ह्याचे खरीपाचे क्षेत्र ४ लाख ९० हजार हेक्टर आहे. सध्या जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
हेही वाचा… भारतात बनावट व्यवहारातून १३ हजार कोटींची करचोरी, जीएसटीबाबतचे प्रकरण काय?
त्यात भात ३ हजार ५३३ हेक्टर, कापूस ४८ हजार ७७६, तूर ४ हजार ५२८, तर ८ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. पुरेशा पावसाअभावी अजूनही ४ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडलेल्या आहेत.