चंद्रपूर: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये, गत सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट असेल, तर येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगावू रक्कम देण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सद्यस्थितीत सोयाबीन पिकाची अवस्था पाहता प्रधानमंत्री पीक विमा योजना, जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोयाबीन या अधिसुचित पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगावू रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी ओरियंटल इन्शुरन्स विमा कंपनी, चंद्रपूर यांना आदेशित केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे या बाबी अंतर्गत अधिसुचित विमा क्षेत्र घटकातील सोयाबीन पिकाकरीता राज्य शासनाचे अधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक विमाधारक शेतकऱ्यांना अतिरिक्त २५ टक्के रक्कम देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.

हेही वाचा… उद्या २३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान; पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध शनिवारी सूर्यापासून समान अंतरावर

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंमागामध्ये पडलेला पावसाचा खंड, उशिराने झालेली पेरणी, पिकांची उद्भवलेली परिस्थिती इत्यादी कारणांमुळे पिकांच्या पेरणी व काढणीच्या तारखांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांस विमा कंपनीने सहमती दर्शविली असल्याचे आदेशात नमुद आहे. सदर आदेशानुसार विमा कंपनी यांनी ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून १ महिन्याच्या आत या तरतुदीनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन या अधिसुचित पिकाकरीता महसूल मंडळातील सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगावू रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. सदर जोखीम अंतर्गत बाधित अधिसूचित क्षेत्रातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केल्यानंतर सदर शेतकरी हे पीक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील व नुकसान भरपाईची आगावू रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमुद आहे.

५० टक्क्यांपेक्षा जास्त घट असलेले अधिसूचित महसूल मंडळ

चंद्रपूर, घुग्घुस, पडोली, बेंबाळ, पाथरी, व्याहाड, बल्लारपूर, वरोरा, मांढेळी, चिकणी, टेंमुर्डा, खांबाडा, शेगाव, भद्रावती, घोडपेठ, चंदनखेडा, मुधोली, मांगली रै, नंदोरी, चिमूर, मासळ बु., खडसंगी, नेरी, भिसी, जांभुळघाट, शंकरपूर, चौगान, अ-हेर नवरगाव, राजुरा, विरुर स्टे, कोरपना, गडचांदूर, गोंडपिपरी, धाबा आणि पोंभुर्णा याचा समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soybean crop insurance farmers will get 25 percent additional amount orders of collectors in chandrapur rsj 74 dvr