अमरावती : सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्‍याच्‍या आणि सोयाबीन, कापसासाठी भावांतर योजना लागू करण्‍याच्‍या महायुतीच्‍या घोषणेनंतर बाजारात सोयाबीनचे दर किंचित वाढले, पण आता राज्‍यात सत्‍तास्‍थापनेच्‍या हालचाली सुरू असताना विदर्भात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत सोयाबीन विकावे लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोयाबीनला सरकारने ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. सध्‍या विदर्भातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांमध्‍ये सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

यंदा हंगामाच्‍या सुरुवातीपासूनच सोयाबीनचे दर कमी असल्‍याने सरकारने हमीभावाने खरेदी करण्‍याचा निर्णय घेतला. नाफेड आणि एनसीसीएफच्‍या माध्‍यमातून १५ ऑक्‍टोबरपासून सोयाबीन खरेदी सुरू करण्‍यात आली. सुरुवातीला सोयाबीनमधील ओलाव्‍याचे प्रमाण १२ टक्‍क्‍यांपेक्षा कमी हवे, या निकषामुळे खरेदीला वेग आला नाही. त्‍यानंतर सरकारने ओलाव्‍यातील निकषात बदल केले. ओलाव्‍याचे प्रमाण १२ टक्‍क्‍यांहून १५ टक्‍क्‍यांपर्यंत नेण्‍यात आले. परंतु, यात नोंदणीची मुदत ३० नोव्‍हेंबरला संपणार असल्‍याने अडचण निर्माण झाली. बारदाण्‍याच्‍या तुटवड्याचाही प्रश्‍न मध्‍यंतरीच्‍या काळात निर्माण झाला. त्‍यामुळे हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकला नाही.

हेही वाचा – तपासा आपले शरीर, तयार करा आरोग्य कुंडली, काय आहे उपक्रम ते बघा

२७ नोव्‍हेंबर रोजी अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत ७ हजार ३७७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. किमान ४ हजार तर कमाल ४ हजार २२१ रुपये म्‍हणजे सरासरी ४ हजार ११० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. २६ नोव्‍हेंबरला ९ हजार ९८४ क्विंटल आवक झाली आणि सरासरी ४ हजार ४० रुपये दर मिळाला. सोयाबीनच्‍या दरात गेल्‍या आठवडाभरात सुमारे तीनशे रुपयांची घसरण झाली आहे.

सोयाबीन नगदी पीक मानल्या जात असले तरी या पिकातून यंदा शेतकऱ्यांना फारसे उत्‍पन्‍न हाती लागले नाही. शेतकरी सोयाबीन पिकाच्या विक्रीवर दिवाळी साजरी करतो. यंदा हंगामाच्या प्रारंभापासूनच सोयाबीनचे दर पडले होते. सरकारने हमीदराने सोयाबीन खरेदीची घोषणा केली, तरी बाजारातील चित्र मात्र विपरीत आहे. कोणत्याच बाजारात सोयाबीन आतापर्यंत हमीदराने विकल्या गेले नाही. प्रतवारी घसरल्याने दर मिळत नसल्याचे खरेदीदारांचे म्हणणे होते.

हेही वाचा – बुलढाणा : शंभर उमेदवार ‘क्लिन बोल्ड’, दारूण पराभव अन् ‘डिपॉझिट’ही गमावले

सततच्या पावसाने सोयाबीनचे दाणे पूर्ण भरले नाहीत. त्यातच सुरुवातीच्‍या काळात बाजारात येत असलेल्या सोयाबीनमध्ये ओलावा अधिक प्रमाणात असल्याने भाव कमी होतात. त्याचा एकूणच परिणाम दरांवर झाल्‍याचे सांगण्‍यात आले.

बारदाण्‍याच्‍या तुटवड्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रांवर प्रत्‍यक्ष सोयाबीन खरेदीसाठी उशीर झाला. त्‍यातच ओलाव्‍याचे प्रमाण अधिक असल्‍याने शेतकऱ्यांना या केंद्रांवर सोयाबीन विकता आले नाही. हमीभाव केंद्रावर खरेदीसाठी अद्यापही वेग न आल्‍याने या केंद्रांवर १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती मार्केट फेडरेशनकडून देण्‍यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soybean price lower than guaranteed price vidarbha farmers amravati farmers selling soybean at low price mma 73 ssb