अकोला: ‘यलो मोझॅक’ रोगाने सोयाबीन पिकांवर आक्रमण केल्याने त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर झाला आहे. यामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. बाधित क्षेत्राचा सर्व्हे कृषी विभागाने केला असून जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ४९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित आढळले. ‘यलो मोझॅक’च्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. बहुतांश कोरडवाहू शेतकरी वर्ग सोयाबीनचे उत्पादन घेण्याकडे वळला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक’चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांपुढे नवी अडचण निर्माण झाली. ‘यलो मोझॅक’ रोगाचा सोयाबीन पिकावर प्रचंड दुष्परिणाम झाला. या विषाणूजन्य रोगामुळे पीक पिवळे पडून करपले होते. या सर्वांचा परिणाम उत्पादनावर झाला. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली.

हेही वाचा… तुरीच्या शेतात गांजाची लागवड, कडाक्याच्या थंडीत झाडांची मोजणी; कारवाई करताना अधिकारी, कर्मचारीही चक्रावले

‘यलो मोझॅक’ हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज व मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे तलाठी ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यामार्फत पंचनामे करण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे केले असता ४९ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात ‘यलो मोझॅक’ रोगामुळे सर्वाधिक २२ हजार ४५६ हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्या खालोखाल बार्शीटाकळी तालुक्यात १२ हजार १४५, पातूर ११ हजार ३०२ व बाळापूर तालुक्यात तीन हजार ५०८ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यामध्ये आढळून आले आहे. याचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. नुकसानग्रस्त शेतकरी संकटात असून त्यांना मदत केव्हा मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soybean production decreased due to yellow mosaic affecting 49 thousand hectares of crops akola ppd 88 dvr