अमरावती : राज्यात बारदान्याअभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदीची मुदत १२ जानेवारी रोजी संपल्यानंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ दिली. तरीही विदर्भातील बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच आहे.
मंगळवारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत ६ हजार २१० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. किमान ३ हजार ९५०, तर कमाल ४ हजार ११० रुपये म्हणजे सरासरी ४ हजार ६० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गेल्या ११ जानेवारीला ७ हजार ५३९ क्विंटल आवक होऊन किमान ३ हजार ९५०, कमाल ४ हजार २१२ म्हणजे सरासरी ४ हजार ८१ रूपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. गेल्या तीन ते चार दिवसांत सोयाबीनच्या दरात २० रुपयांची घट झाली आहे. विदर्भातील इतर बाजार समित्यांमध्ये हीच परिस्थिती असून अनेक ठिकाणी सोयाबीनचे सरासरी खरेदी दर हे चार हजारांपेक्षा कमी आहेत.
हेही वाचा – VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
यंदाच्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले असले तरी खुल्या बाजारात साडेतीन ते चार हजार रुपये दर मिळत असल्याने हमीभावाने खरेदी करावी यासाठी शेतकरी आग्रही आहेत. मात्र, ‘नाफेड’ने १२ टक्के ओलाव्याची अट घातल्याने आत्तापर्यंत नोंदणी केलेल्या सात लाख ४९ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ २ लाख ५ हजार ५३९ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले आहे.
राज्यात १४ लाख १३ हजार २७० मेट्रिक टन खरेदीचे लक्ष्यांक निश्चित करणाऱ्या राज्य सरकारने १५ ऑक्टोबर ते १२ जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात ३ लाख १० हजार १६१ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे. अमरावती जिल्ह्याचा त्यामध्ये वाटा २१० मेट्रिक टन आहे.
जिल्ह्यात सहा जानेवारी या मुदतवाढीच्या टप्प्यावर १९ हजार ८०१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १० हजार २६८ शेतकऱ्यांचा २ लाख १० हजार ५९५ क्विंटल सोयाबीन खरेदी झाला आहे. उर्वरित ९ हजार ५३३ शेतकऱ्यांना खुल्या बाजाराशिवाय पर्याय राहिलेला नाही. सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटलला हमीदर आहे, तर खुल्या बाजारात सरासरी ४२०० रुपये दर आहेत.
अमरावती बाजार समितीत सरासरी दराने सात लाख ६६ हजार ६२१ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. हमीदरापेक्षा चारशे ते पाचशे रुपये कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावी लागली.
© The Indian Express (P) Ltd