वर्धा, सतत संकटाशी लढतो, तो शेतकरी अशी शेतकरी नेते शेतकऱ्यांची व्याख्या करतात. नैसर्गिक, सामाजिक, मानवनिर्मित अशा वेगवेगळ्या पातळीवर तो लढतो. अतिवृष्टी, धुके, गारपीट या संकटास तोंड देत आता काही उत्पादन हाती आले. तोच भाव पडत असल्याचे चित्र. ते सहन करीत माल विकायला आणल्या जात आहे. तोच आता सोयाबीन खरेदी ठप्प पडली. कारण काय तर बारदाना संपला. सोयाबीन विकायला नाफेड केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांना हे उत्तर मिळत आहे. सोयाबीन विक्रीसाठी ९ हजार ४ शेतकऱ्यांनी नोंद केली होती.
हेही वाचा >>> थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
यापैकी ३ हजार ८१५ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आली. आधारभूत खरेदी अंतर्गत जिल्ह्यात नाफेड मार्फत १५ ऑक्टोबर २०२४ पासून सोयाबीन खरेदीस सुरवात झाली. त्यातच गत काही दिवसात शेतकरी नोंदणी व खरेदी प्रक्रियेत वेग आला. मात्र एवढ्यातच बारदाना (रिकामी पोती) म्हणजे सोयाबीन भरून ठेवण्याची पोतीच संपली. असलेला बारदाना स्टॉक अपुरा ठरला. परिणामी शेतकरी तिष्ठत बसले. माल परत नेण्याची व साठवून ठेवण्याची आपत्ती आली आहे. उर्वरित आता एक लाख क्विंटल सोयाबीन खरेदी होणे अपेक्षित आहे. पण बारदानाच नाही. जिल्हा पणन अधिकारी बी. वाय. शेख हे म्हणाले की सध्या बारदाना तुटवडा आहे. त्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयास २ लाख बारदाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या दोन तीन दिवसात बारदाना उपलब्ध होईल. तो प्राप्त होताच सोयाबीन खरेदी सूरू करण्यात येणार, असे शेख यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>> प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्याना दिला हा प्रस्ताव, फडणवीस म्हणाले नक्कीच विचार करू
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सतीश दाणी हे म्हणाले की शुद्ध भोंगळपणा ठरतो. कारण अपेक्षित उत्पादन जिल्ह्यात किती होणार व त्यासाठी बारदाना लागणार याची पूर्वकल्पना अधिकारी वर्गास असते. तसा साठा करून ठेवणे अपेक्षित आहे. उलट शेतकऱ्यांकडील २५ टक्केच माल नाफेड कडे येतो. हेक्टरी ११ क्विंटल ९५ किलोच खरेदी करण्याचे निर्बंध आहे. त्यामुळे माल अन्यत्र विकल्या जातो. २५ टक्केच नाफेडकडे येतो. तेवढा बारदाना साठा करून ठेवल्या जात नसेल तर काय म्हणावे, असा सवाल दाणी करतात. नियोजनशून्य कारभार म्हणावा लागेल, अशी टीका पण त्यांनी केली. आतापर्यंत जिल्ह्यात ७६ हजार २१३ क्विंटलची खरेदी झाली आहे. वर्धा केंद्रावर १३ हजार २७० क्विंटल तर देवळी ९ हजार ४२०, पुलगाव ३ हजार ७६३, कारंजा ३३६, आष्टी ४ हजार ५३७, हिंगणघाट १८ हजार ७५८, समुद्रपूर ११ हजार ८३०, जाम नाफेड केंद्रावर १४ हजार ३१४ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे.