नागपूर : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित २० चित्त्यांपैकी एक महिन्याच्या आतच दोन चित्त्यांचा मृत्यू झाल्याने अधिवासाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. जागा आणि पुरेशा सुविधांच्या अभावी त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रमुख कारण समोर आले आहे. दोन चित्त्यांचा मृत्यू हा या प्रकल्पासाठी मोठा धक्का आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नामिबिया येथून सप्टेंबर २०२२ मध्ये आठ तर दक्षिण आफ्रिकेतून फेब्रुवारी २०२३ मध्ये १२ चित्ते मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करण्यात आले. त्यातील पहिल्या टप्प्यातील ‘साशा’ या मादी चित्त्याचा मृत्यू मार्चमध्ये झाला. तर रविवारी दुसऱ्या टप्प्यातील ‘उदय’ या नर चित्त्याचा मृत्यू झाला. चित्त्यांच्या संख्येच्या तुलनेत कुनोचे क्षेत्रफळ कमी आहे. शिवाय त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मनुष्यबळाची देखील कमतरता आहे. त्यामुळे जागेसोबतच पुरेसे मनुष्यबळ आणि इतरही सुविधांची आवश्यकता आहे. सुरुवातीपासूनच या प्रकल्पाची धुरा हाताळणारे वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. यजुवेंद्रदेव झाला यांनी या शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, राजकीय श्रेयवादाच्या लढाईत प्रकल्पातील त्रुटींवर बोट ठेवणाऱ्या डॉ. झाला यांना या प्रकल्पातून बाहेर काढण्यात आले. आता त्यांनी सांगितलेले धोके प्रत्यक्षात उतरत आहेत. एकाच महिन्यात दोन चित्त्यांचा मृत्यू ही या प्रकल्पासाठी मोठा धक्का आहे. ‘सियाया’ या मादी चित्त्याने अलीकडेच चार शावकांना जन्म दिला असला तरी दोन चित्त्यांच्या मृत्यूमुळे प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश वन्यजीव मंडळाच्या बैठकीत जागेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गांधीसागर अभयारण्य येत्या सहा महिन्यात चित्त्यांचा अधिवास म्हणून विकसित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्याआधीच दुसऱ्या चित्त्याच्या म़ृत्यूची घटना समोर आली आहे. या प्रकल्पाचे तत्कालीन प्रमुख डॉ. यजुवेंद्रदेव झाला यांनी लोकसत्ताशी बोलताना राजस्थानमधील मुकुंद्रा अभयारण्य चित्त्यांचा अधिवास म्हणून पूर्णपणे योग्य असल्याचे सांगितले होते.

वन्यजीव शास्त्रज्ञांचा इशारा खरा

चित्त्यांना भारतात आणण्याच्या काही महिन्यांपूर्वी, एक जोखीम व्यवस्थापन योजना तयार करण्यात आली होती. त्यात कुनोचे क्षेत्र सोडून बाहेर जाणाऱ्या चित्त्यांना हाताळण्यासाठी ‘आकस्मिक योजना’तयार करण्याचा ही मुद्दा होता. ‘ओबान’ ऊर्फ ‘पवन’ हा चित्ता दोनदा बाहेर गेला. दुसऱ्यांदा त्याला उत्तर प्रदेशच्या सीमेवरून परत आणण्यात आले. चित्ता बाहेर जात आहे याचाच अर्थ त्यांना लागणारे भक्ष्य आणि जागा कमी पडत आहे. चित्त्याला त्याच्या हालचालीसाठी सुमारे १०० चौरस किलोमीटर क्षेत्र आवश्यक आहे. त्यामुळे याबाबतही वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. यजुवेंद्रदेव झाला यांनी दिलेला इशारा खरा ठरत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Space in kuno is insufficient for cheetahs amy