वर्धा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे अफलातून कल्पना व त्याची पुरेपूर अंमलबजावणी. विदर्भातील शेतकऱ्यांविषयी ते विशेष आस्था बाळगत असल्याचे ऍग्रो टेक व अन्य उपक्रमातून दिसून आले आहे.

आता जागतिक पातळीवर मागे पडलेल्या नागपुरी संत्र्यास पूढे आणण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. संत्री फळाची काशी म्हणून स्पेन या देशाची ओळख आहे. तेथील युरोसोमीलास या कंपनीस ते ३२ शेतकऱ्यांसह भेट देऊन आले आहेत. याच कंपनीसोबत सामंजस्य करार पण करण्यात आला. पुढील तीन वर्ष त्याचा प्रयोग करीत फालनिष्पत्ती तपासल्या जाईल.

आपल्याकडे हेक्टरी संत्रा उत्पादन ७ टन होत असते. तर या युरोसिमीलास कंपनीच्या फार्मिंगवर हेक्टरी ७० टन म्हणजे आपल्यापेक्षा दहा पट अधिक. वर्षातून तीन हंगाम. सामूहिक शेती व प्रती हेक्टर ७४० झाडे. रोपे लागली की तिसऱ्या वर्षांपासून उत्पादन सूरू. उत्पादन मूल्य कमी व उत्पादन अधिक.

तिकडे पण उन्हाळ्यात ३८ ते ४४ अंश तापमान. ड्रीप पद्धतीने ओलीत. लगतच पॅकेजिंग सिस्टीम. दिवसास १ लाख ६० हजार संत्र्यांचे पॅकेजिंग. निर्जतुकीकरण व बुरशीनाशक लावून तयार. रोपांची लागवड पण कुंडीत व अभिनव पद्धतीने. विविध २१ वाण. तर अशी ही टॅंगो संत्री रसाळ व रंगात आकर्षक.

आता नितीन गडकरी व सहकारी सामंजस्य करार करीतच भारतात परतले आहे. याची सुरवात करोना काळात झाली. महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे हे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे यांच्या संपर्कात आल्यावर शेतीविषयक चर्चा झाली. विदर्भातील संत्री ही उत्पादन घेण्यासाठी लावल्या जातात की झाडाचा इंधन म्हणून उपयोग करण्यासाठी, असा गंम्मतदार प्रश्न झाला.

संत्रा उत्पादन वाढावे म्हणून काही तरी केले पाहिजे, या भावनेने ठाकरे यांनी शिंदे यांची भेट नितीन गडकरी यांच्याशी घालून दिली. गडकरी यांना शिंदे यांचे व्हिजन पटले. त्यातून स्पेनचा टॅंगो नजरेत आला. सरकारी पातळीवरील सर्व अडसर गडकरी यांनी दूर केल्यानेच सगळं जुळून आल्याचे ठाकरे सांगतात. स्पेनच्या कंपनीसोबत करार झाला आहे. पहिल्या टप्प्यात काटोल व शेंदुर्जाना येथे टॅंगो लागवड होणार. स्पेनची कंपनी लागवड, उत्पादन व तांत्रिक मार्गदर्शन करणार. तीन वर्षात बहर तपासणार. आपले हवामान कितपत मानवते तसेच अन्य बाबा तपासू. पुढे मोठ्या प्रमाणात लागवड घेतल्या जाईल, असे ठाकरे सांगतात.

संत्रा बागायतदारच  नव्हे तर पारंपरिक शेती करणारे शेतकरी पण टॅंगो उत्पादन घेऊ शकतील असा प्रयत्न आहे. पुढील दहा वर्षाचा राज्याच्या अर्थकारणाचा हा रोडमॅप  ठरू शकतो असा गडकरी यांना विश्वास वाटत असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. स्पेनच्या अभयसदौऱ्यात बरेच काही शेतीकारण शिकायला मिळाल्याचे ते म्हणतात.

Story img Loader