शहरात वीजपुरवठा करणाऱ्या स्पॅन्को नागपूर डिस्कॉन लिमिटेड (एसएनडीएल)सोबत आधीच्या सरकारने केलेला करार बघता त्यांच्यावर तातडीने कारवाई करणे अडचणीचे असले तरी त्यांच्याविरोधात आलेल्या तक्रारी बघता त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
लोकसत्ता कार्यालयाला त्यांनी भेट दिली, यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘एसएनडीएल’च्या विरोधात नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली असून या संदर्भात चौकशी करण्यासाठी गेल्या एप्रिल महिन्यात दोन सदस्यीय सत्यशोधन समिती नियुक्त केली. या समितीत होल्डिंग कंपनीचे संचालक राजकुमार गोयंका आणि ग्राहक पंचायतच्या सदस्य गौरी चंद्रायण यांचा समावेश होता. या समितीकडे वीज ग्राहकांच्या एकूण १२ हजार तक्रारी दाखल झाल्या. समितीने ऊर्जा खात्याकडे चौकशी अहवालसुद्धा सोपविला आहे.
आधीच्या सरकारने केलेला करार बघता ‘एसएनडीएल’च्याविरोधात तातडीने कारवाई करणे अडचणीचे असले तरी नागरिकांनी केलेल्या तक्रारी बघता कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. या कंपनीच्या विरोधात बऱ्याच तक्रारी आहेत. त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. दोन महिन्यांत नागरिकांच्या तक्रारीचे निरसन कंपनीने करावे, असे निर्देश दिले आहेत. निर्मल नगरी सोसायटीने चुकीच्या मार्गाने वीज जोडणी केलेली असताना ‘एसएनडीएल’ने त्यांच्यावर कारवाई केली नसेल तर त्यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात येईल आणि त्याबाबत अहवाल मागविण्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले.
गेल्या काही दिवसांत वाकी आणि झिल्पी येथे नद्यांमध्ये बुडून युवक मृत्युमुखी पडत आहेत. त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. तेथे धोकादायक ठिकाणी कुठलीही सूचना नाही. त्यामुळे अनेक युवक पाण्यात उतरल्यानंतर मृत्युमुखी पडतात. गेल्या वर्षभरात या दोन्ही ठिकाणी २५ पेक्षा जास्त जण बुडाले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि सिंचन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.

राज्य सरकारने रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाची यादी मे महिन्यात जाहीर केली. या मंडळावर विदर्भाचा एकही सदस्य नसल्यामुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्चर्य व्यक्त केले. विदर्भात अनेक चांगले कलावंत आणि वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात असताना प्रत्येकवेळी रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाची परवानगी घेण्यासाठी मुंबई आणि पुण्याला जाणे योग्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर, याबाबत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करतो, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader