शफी पठाण, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : पाखरांच्या पंखात विसावलेल्या चिंब पावसाच्या थेंबांवर काळ्या मातीचे गर्द जांभळी झेले पांघरून शब्दांनी लगडलेल्या कवितेच्या बनात मनसोक्त विहरणारे महानोर आता निघून गेलेत ढगाआड लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची चांदनकथा वाचायला…

ही चांदनकथा तसे निमित्तच असेल नाही? तसे नसते तर ढगापल्याड नक्षत्रांच्या राशी पायात लोळण घेत असतानाही तिथल्या जीवांना इतका का मोह झाला असता ‘रानातल्या कविता’ ऐकायचा? महानोरांचा आवडता पाऊस त्यांच्या माळरानातील घराभोवतालची हिरवी शेते आबादानी करत असताना त्यांनी का पाठवला असता सांगावा परतीचा? पण, हा सांगावा आला आणि महानोर तडक निघालेत कुसुंब्या रात्रीची असंख्य स्वप्ने मागे सोडून.

आताशा पोहोचलेही असतील त्या चांद्रगौरीच्या प्रदेशात आणि वाणीत फुलांचा राजसपणा एकवटून सांगत असतील ‘ऐसी कळवळ्याची जाती’मधल्या घनगर्द आठवणी….गात्रात कंपणारा ओला स्वर साठवून ऐकवत असतील ‘पळसखेडची गाणी’. सांगत असतील, अजिंठ्याच्या चिरकालीन अक्षरशिल्पाच्या पायथ्याशी मातीभरल्या हातानी अतिशय निगुतीने केलेल्या कवितेच्या मशागतीची कहाणी. मोठ्या आनंदाने दाखवत असतील त्यातून उगवलेली पुण्यफळे आणि त्या फळांच्या अमरात्ववासाठी नभाने भुईला दिलेल्या दानाची निशाणी. आणि चांद्रगौरीच्या प्रदेशातील ‘अज्ञानी’ जीवही अनुभवत असतील कानात प्राण आणून महानोरांच्या उत्कट निसर्गप्रेमाची तन्मयतेनी रेखाटलेली मंत्राक्षरे. हे सर्व ऐकत असताना नाकाशी दरवळत असेल महानोरांच्या शब्दांमधील आंब्याच्या झाडाला बिलगलेला मोहोराचा वास… जाणवत असेल गाभुळलेल्या चिंचेला न पेलणारा नवतीचा भार…डोळ्यापुढे नाचत असतील फुलात न्हाहलेल्या ओल्या क्षितिजावरती झुलणारे चंद्रझुले!

ढगापल्याड ही अशी महानोरांच्या कवितांची मस्त मैफल रंगली असताना इकडे पृथ्वीवर मात्र त्यांचा देह पडलाय निपचित. जन्मोजन्मीचे लक्तरलेले दुःख पांघरून. मृत्यू नावाच्या विश्वात्मक वास्तवाला कवटाळून. उद्या हा देहही दिसणार नाही. म्हणून का महानोर संपतील? छे… ते तर आलेच मुळात मर्तिकाच्या क्षणिक दुःखावर ‘अमर’ आयुष्याचे पांघर घालायला. लखलख उन्हात न्हाहूनही श्रावणाचे गाणे सांगायला. हे गाणे निनादत राहील महानोरांनी शब्दांनी सिंचलेल्या काव्यशेतीतील अगणित ढेकळामधून….या गंधित ढेकळ्यांच्या ओढीने जेव्हा नभांचे आनंदले लोट उतरतील जमिनीवर तेव्हा फांदीवर डोलणारे जास्वंदीचे फूल अलगद झेलून घेईल हे गाणे. महानोर असे दिसत राहतील या फुलातून त्या फुलात, विहरत राहतील या वनातून त्या वनात…आणि सांगत राहतील….

रान हासे अंकुरातुन चंद्रलेणे सांडले
अन् कुणाचे पाहताना भागलेती डोळुले
लाख प्राणांची रिणाई बोलता ओथंबली
एक भोळी शब्दगाथा आरतीने व्यापली
झेलताना दान ऐसे नम्र झाल्या ओंजळी
मृत्तिकेच्या चंदनाची रेघ भाळी वंदिली…!

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Specail news about senior poet n d mahanor scj