लोकसत्ता टीम
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपुरात आले. नागपूर विमानतळावर सकाळी ८:३० आगमन झाल्यावर मोदी थेट रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसरात गेले. यावेळी त्यांनी डायरीत संदेश लिहिला. त्यांच्या ११ वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच रेशीमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली.
यावेळी त्यांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. स्मृती मंदिरात मोदी यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. मोदी आणि संघाचे घनिष्ठ नाते आहे. राजकीय जीवनाला सुरुवात होण्यापूर्वी मोदी यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून अनेक वर्षे संघात काम केले.
काय म्हणाले मोदी?
हेडगेवारजी आणि पूज्य गुरूजी यांना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या स्मृतींना जपणाऱ्या या स्मृती मंदिरात येऊन मी भारावून गेलो आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटन क्षमतांच्या मूल्यांना समर्पित ही जागा राष्ट्रसेवेसाठी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. संघाच्या या दोन महान स्तंभांची आठवण देणारी ही जागा देशसेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जा केंद्र आहे.
आपल्या प्रयत्नांमुळे माँ भारतीचे वैभव सदैव वृद्धिंगत होवो!