लोकसत्ता वार्ताहर
धुळे: तालुक्यातील दोंडाईचा-धुळे रस्त्यावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाशेजारील अनधिकृत बायोडिझेल पंपावर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी. जे. शेखर यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. १५ लाख ३३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पथकाने धुळे तालुक्यातील मोराणे शिवारात छापा टाकून जुगारींसह लाखो रुपये किमतीची वाहने जप्त केली होती. यानंतर पुन्हा एकदा महानिरीक्षक शेखर यांच्या विशेष पथकाने दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकल्याने स्थानिक पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. छाप्यात बाळू जोशी (४२, डांबरी घरकुल, दोंडाईचा), शेख सलीम (५५), शेख अबरार (१९, रा. कैसर कॉलनी,औरंगाबाद), वसीम पिंजारी, दीपक साळुंखे (रा. दोंडाईचा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा… वसंतराव नाईक महामंडळाच्या जळगाव जिल्हा व्यवस्थापकासह कर्मचार्यास लाच घेताना अटक
अनधिकृतरित्या बायोडिझेल आणि पेट्रोल पंप उघडून कुठलीही सुरक्षात्मक उपाययोजना न करता पाच संशयोतांनी बायोडिझेलसदृश्य ज्वालाग्रही द्रवाचा साठा करुन विक्री सुरू केली होती. विशेष पथकातील हवालदार स्वरुपसिंग पाडवी यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे