लोकसत्ता टीम
अमरावती: आषाढी एकादशीचे औचित्य साधून देशभरातील हजारो विठ्ठल भाविक पंढपुरात लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. पश्चिम विदर्भातील वारकऱ्यांसाठी दोन विशेष गाड्या आणि त्यांच्या प्रत्येकी दोन फेऱ्या अशा आठ गाड्या वारी विशेष म्हणून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्या नवी अमरावती आणि खामगाव येथून पंढरपूर आणि पुन्हा परतीचा प्रवास करतील. पण, या गाड्यांच्या फेऱ्या कमी करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
अमरावती, अकोला बुलढाणा जिल्ह्यातून या गाड्या भाविकांना घेऊन पंढरपुरात दाखल होणार आहेत. गाडी क्रमांक ०१११९ अमरावती-पंढरपूर ही विशेष गाडी २५ व २८ जूनला नवी अमरावती रेल्वे स्थानकावरून दुपारी २.४० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी २६ आणि २९ जुलैला सकाळी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०११२० पंढरपूर-अमरावती विशेष गाडी २७ व ३० जूनला सायंकाळी ७.३० वाजता पंढरपुरहून निघून दुसऱ्या दिवशी २८ जून आणि १ जुलैला दुपारी १२.४० वाजता नवी अमरावतीला पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ०११२१/०११२२ खामगाव-पंढरपूर-खामगाव चार फेऱ्या करेल.
हेही वाचा… सिंधूताईंच्या माहेरच्या वारकऱ्यांना कर्मभूमी पुण्यात पुरणपोळीचा पाहुणचार
नवी अमरावतीहून सुटणाऱ्या रेल्वेगाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर हे थांबे आहेत. एक द्वितीय वातानुकूलित ,दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ७ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन, अशी गाडीची संरचना आहे.