गोंदिया : येत्या रविवार ३० मार्च पासून चैत्र नवरात्री ला सुरुवात होणार आहे. छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे चैत्र नवरात्रीला बमलेश्वरी देवी दर्शना करिता छत्तीसगड राज्यसह शेजारील महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेश राज्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी बघता, भाविकांच्या सोयीकरिता बमलेश्वरीधाम डोंगरगड रेल्वे स्थानका साठी रेल्वेने काही विशेष गाड्या धावणार अशी सोय केली आहे. या सोबतच या मार्गावरील सर्व जलद (एक्स्प्रेस) गाड्या ही डोंगरगड येथे थांबतील असे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक यांनी पत्रका द्वारे जाहीर केले आहे.

चैत्र नवरात्री निमित्त ३० मार्च ते ६ एप्रिल २०२५ या कालावधीत डोंगरगड येथील माँ बमलेश्वरी मंदिरात जाणाऱ्या लोकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून काही गाड्यांचा विस्तार आणि काही गाड्यांना तात्पुरता थांबा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डोंगरगड रेल्वे स्थानकावर ३० मार्च ते ६ एप्रिल २०२५ दरम्यान थांबणाऱ्या गाड्या मध्ये गोंदिया-दुर्ग-गोंदिया मेमू ( रायपूर पर्यंत, रायपूर-डोंगरगड-रायपूर मेमू गोंदिया पर्यंत वाढवण्यात आली आहे. डोंगरगड- दुर्ग-डोंगरगढ मेमू तसेच दुर्ग-रायपूर-दुर्ग मेमू विशेष ट्रेन देखील विशेष गाड्या म्हणून चालवल्या जातील. तात्पुरत्या गाड्यांमध्ये बिलासपूर-भगत की कोठी एक्सप्रेस बिलासपूर-बिकानेर एक्सप्रेस बिलासपूर-चेन्नई एक्सप्रेस बिलासपूर-पुणे एक्सप्रेस आणि पुणे हा बिलासपूर एक्सप्रेस. तसेच इंटरसिटी एक्स्प्रेस , इतवारी-कोरबा एक्स्प्रेस , इतवारी-बिलासपूर एक्स्प्रेस मध्येही तात्पुरती कोचची सुविधा दिली जाणार आहे.

या संदर्भात वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग चे दिलीप सिंग,म्हणाले की, यात्रे दरम्यान भाविकांची सुरक्षा, सोय सुविधा आणि रेल्वे मालमत्तेचीही सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार आहे.

रविवार ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधी साठी अतिरिक्त बुकिंग क्लर्क, तिकीट तपासणीस , साधारण कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आदि नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय पिण्याच्या पाण्याची व स्वच्छता गृहांची पुरेशी व्यवस्था, रेल्वे संरक्षण दल आणि स्काऊट व गाईडची टीम तैनात करण्यात येणार आहे. या शिवाय दरेकसा आणि सालेकसा येथे गाड्यांचे संचालन आणि वक्तशीरपणा आणि वेग नियंत्रणा वर विशेष लक्ष दिले जाणार आहे. ज्यामुळे या सर्व रेल्वेगाड्या आपल्या निर्धारित वेळेत आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचतील याची ही काळजी रेल्वे विभागा द्वारे घेतली जाणार असल्याचेही दिलीप सिंग यांनी कळविले आहे.