सोसायटी फॉर वाईल्डलाईफ कन्झर्वेशन, एज्युकेशन अँड रिसर्च आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य पक्षी निरीक्षण कार्यक्रम २० सप्टेंबरला राबवण्यात आले. या अंतर्गत सुमारे १०० पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली.
नागपूर शहराच्या ३० किलोमीटरमध्ये दोन बाय दोन किलोमीटरचे ७६४ चौरस बनवले होते. त्यापैकी रॅडमाईज्ड पद्धतीने १२ ग्रीडस निवडण्यात आल्या होत्या. पक्षी निरीक्षकांनी त्यांना दिल्या गेलेल्या चौरसात ट्रान्सॅक्ट लाईन पद्धतीने सकाळी ७ ते ९ या वेळेत चालताना बघितलेल्या व ऐकलेल्या पक्ष्यांची नोंद करावयाची होती. वाईल्ड सीईआरतर्फे सामान्य पक्षी निरीक्षण प्रकल्पाचे समन्वयक समीर शेंद्रे आणि शुभम पाटील यांनी सांगितले की, पक्षीमित्रांनी या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दाखवल्याने ग्रीड्सचीसंख्या वाढवून आठच्या ऐवजी १२ करण्यात आली. आम्ही सर्व पक्षीमित्रांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना फिल्ड रेकॉर्डीग शीट, थ्रीट रेकॉर्डीग शीट आणि अॅडिशनल इन्फॉर्मेशन शीट देण्यात आल्या. अनेक चौकटीवर मुनीया प्रजातीच्या पक्ष्यांची घरटी आढळून आली. तर अनेकांना पावसाळयाची चाहूल देणारा चातक पक्षी देखील दिसला. काही चौकटीवर माहिती मिळवताना पक्ष्यांची शिकार होत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती आता वनखात्यालासुद्धा पाठवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पक्ष्यांची संख्या व ज्यांची जीवनशैली अभ्यासण्याची संधी साध्या व सुलभ पद्धतीने मिळाली. तसेच दुर्मीळ प्रजाती किंवा स्थलांतरित पक्ष्यांसाठीच पक्षी निरीक्षण करीत असल्याने सामान्य पक्ष्यांकडे दुर्लक्ष होते. या प्रकल्पात सहभागी झाल्यामुळे पक्षी निरीक्षणाला एक नवी दिशा मिळाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा