अकोला : जिल्ह्यातील दगडपारवा येथे भाजपच्यावतीने आयोजित नमो चषक कबड्डी स्पर्धेदरम्यान क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित राहिल्याने प्रेक्षक गॅलरी कोसळल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत ३१ प्रेक्षक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप नेत्यांनी रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस केली.
जिल्ह्यात भाजपच्यावतीने विविध क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या असून नमो चषकांचे आयोजन करण्यात आले आहे. बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथे नमो चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध ठिकाणावरून संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना व बक्षीस वितरण समारंभ आज, रविवारी आयोजित करण्यात आला होता. तो पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी उसळली. या स्पर्धेसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या गॅलरीवर क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षक चढल्याने ती कोसळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत ३१ प्रेक्षक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. रुग्णवाहिकेसह खासगी वाहनांमधून जखमींना तत्काळ शासकीय व खासगी रुग्णालयात आणले. काही प्रेक्षकांचे हातपाय फ्रॅक्चर झाले आहेत. जखमींना अकोल्यात खासगी रुग्णालयात हलवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. काही जण किरकोळ स्वरूपात जखमी झाल्याने त्यांना उपचार करून सोडण्यात आले.
हेही वाचा >>>महायुतीत यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून ताणतणाव; नेमकं काय घडलं? वाचा…
भाजपचे विधान परिषद नेते आमदार प्रवीण दरेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणवीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे आदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.दगडपारवा येथे क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक गॅलरीवर चढल्याने ती कोसळून दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ३१ जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहे. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च मी उचलणार आहे, असे मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले.