नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेगमर्यादा ओलांडून धावणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई केली, तसेच अनेक वाहने थांबवून त्यांना मर्यादित वेगात वाहने चालवण्याबाबत समुपदेशन केले. या महामार्गावर दुचाकीने जाणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला. विशेष म्हणजे उद्घाटनानंतर दोन आठवडे होऊनही या महामार्गावर अद्याप सुविधांचा अभाव असल्याचे आढळून आले.
हेही वाचा >>> ‘हे बाळ माझे नाही, सांग कुणाचे पाप’ असे म्हणत बाळालाच बेडवरून…
उद्घाटनाच्या दिवसापासूनच ‘समृद्धी’ महामार्गावर अपघात होत आहेत. नागपुरात अधिवेशन काळातही तेथे अपघाताच्या अनेक घटना घडल्याने त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले होते. त्यानंतर अपघात नियंत्रणासाठी ३० डिसेंबरला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि परिवहन खात्याची संयुक्त बैठक झाली होती. त्यात अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांना थांबवून चालकाचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार एक जानेवारीपासून समृद्धी महामार्गावर नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चौहान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भरधाव वाहनांची तपासणी केली.
हेही वाचा >>> परंपरेत खंड, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय विज्ञान काँग्रेसला येणार नाही, कारण..
मालवाहू ट्रक चालकांना लेन, वेगमर्यादेबाबत माहिती दिली. मात्र, ताशी १२०ची वेग मर्यादा असताना ताशी १५० हून अधिक वेगाने धावणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामार्गावरून रविवारी मोठ्या प्रमाणात दुचाकीने जाणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यांना अधिकाऱ्यांनी थांबवून पुढे जाण्यास मज्जाव केला.
अशा आहेत तक्रारी
महामार्गाचे उद्घाटन ११ डिसेंबरला झाले. मात्र अद्याप तेथे सुविधांचा अभाव आहे. पेट्रोल पंप मोजकेच असून तेथे पिण्याचे पाणी नाही, थांबण्यासाठी, भोजनासाठी जागा नाही, वाहतूक फलक हिंदीत नसल्याच्या तक्रारी वाहनधारकांनी नोंदवल्या.