नागपूर : नागपूरच्या केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर छिंदवाडा महामार्गावर ‘हिट अँड रन’ची भीषण घटना घडली. एका भरधाव कारने एका दुचाकीला जबर धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील बापलेकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी बारा वाजता नागपूर ग्रामीणमधील केळवद-भागेमाहेरीजवळ सावनेर पांढूर्णा रस्त्यावर झाला. शिवाजी परसराम सिरसाम (३८, रा. वल्लीवाघ, ता. काटोल) आणि ललीत शिवाजी सिरसाम (१०) आणि अनिल रमेश सिरसाम (२७, परसोडी, नरखेड) अशी अपघातातील मृतांची नावे आहे. अपघाताची घटना घडताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
हे ही वाचा…भंडारा : कामगार पेटी वाटपदरम्यान चेंगराचेंगरी, सहा महिला गंभीर जखमी
शिवाजी सिरसाम हे मुलगा ललित आणि मित्र अनिल ईवनाते यांच्यासोबत दुचाकीने सोमवारी दुपारी बारा वाजता सावनेरकडे जात होते. सावनेरजवळ भागेमाहेरीगावाजळून जात असताना भरधाव आलेल्या कारने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले. अपघात होताच या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांनी आणि गावकऱ्यांना अपघातग्रस्तांना मदतीसाठी धाव घेतली.
हा अपघात झाल्यानंतर आरोपी कारचालक अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी पळून गेला. नागरिकांनी केळवद पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटातच पोलिसांनी घटनास्थाळवर धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्तांना रुग्णावाहिकेतून शासकीय रुग्णालयात रवाना केले. मात्र, शिवाजी आणि ललीत या बापलेकांचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनिल यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, अनिल यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी केळवद पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा…अमरावती : नितेश राणे, सागर बेगविरुद्ध गुन्हा दाखल, धार्मिक द्वेष निर्माण केल्याचा ठपका…
वल्लीवाघ गावावर शोककळा
एकाच दिवशी बापलेकांचा मृ्त्यू झाल्यामुळे वल्लीवाघ गावावर शोककळा पसरली. शिवाजी आणि त्यांचा मुलगा ललीत या दोघांच्याही मृतदेहावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यामुळे सिरसाम कुटुंबीयांवर शोककळा पसरली. अनिल इवनाते हा शिवाजी यांचा नातेवाईक असून त्यांच्यावर परसोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा…भाच्याला मोबाईल गिफ्ट दिला आणि चोरीचा उलगडा झाला
शहरातही अपघातात एक ठार
नागपुरातील वर्धा रोडवर भरधाव ट्रकने कंटनेरला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रामलाल गोपीलाल चव्हाण (वय ५७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताच्या गुन्ह्यांची नोंद केली असून आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.