नागपूर : विवाहित महिला पती व दोन मुलांसह माहेरी जेवण करायला गेली. रात्री बारा वाजता आईला निरोप देऊन दुचाकीने घराकडे निघाली. मात्र, रस्त्यातच घात झाला. एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या विचित्र अपघातात पती, महिला, मुलगा व तिचे ९ महिन्यांचे बाळ रस्त्यावर फेकल्या गेले. या अपघातात दुभाजकाचा मार लागल्यामुळे बाळ रक्तबंबाळ झाले. स्वत: जखमी असतानाही महिलेने रक्ताने माखलेल्या बाळाला छातीशी कवटाळले. मात्र, काही क्षणातच बाळाचा श्वास बंद झाला. त्यामुळे स्वत:च्या वेदना विसरुन ती आई धायमोकलून रडायला लागली.

अर्धा तास रस्त्यावर आक्रोश

अपघातग्रस्त कुटुंबाचा रस्त्यावर आक्रोश सुरू होता. अपघाताच्या तब्बल अर्ध्या तासानंतर एका वाहनचालकाने त्यांना मदत केली. जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले. पती-पत्नी व ७ वर्षीय मुलावर उपचार सुरु आहेत. ९ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. मुनाहीद शेख असे अपघातातील मृतक बाळाचे तर मुस्कान अंजूम, मुस्ताक शेख आणि मुलगा मिर्झान अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडला.

माजरी, भिलगाव येथील शेख मुस्ताक शेख मोईन हे पत्नी मुस्कान अंजूम, ९ महिन्यांचा मुलगा मुनाहादीन शेख आणि मिर्झान शेख (७) यांच्यासह राहतात. मुस्ताक शेख हे कुटुंबीयांसह रविवारी दुचाकीने (एमएच ४९ सीबी ७७४६) शांतीनगर येथील हातीम अपार्टमेंट येथे सासुरवाडीला गेले होते. तेथे जेवण केल्यानंतर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पत्नी व दोन मुलांना घेऊन घराकडे परत निघाले. ते दहीबाजार पुलाजवळ आल्यानंतर मेहंदीबाग पुलाकडे जात होते. या रस्त्यावरील सतरंजीपुरा विभागीय कार्यालयासमोर रस्ता ओलांडत होते. यादरम्यान, दही बाजार पुलाकडून भरधाव कार त्यांच्या दिशेने आली. कारचालकाने मुस्ताक शेख यांच्या वाहनाला मागून धडक दिली आणि पळून गेला.

बाळाला कवेत घेतले, पण…

अपघातात ते चौघेही दुभाजकावर फेकल्या गेले. पत्नी मुस्कान अंजूम आणि ९ महिन्यांचा मुनाहीद हे दोघे गंभीर जखमी झाले तर मुस्ताक आणि ७ वर्षीय मिर्झान हे दोघे किरकोळ जखमी झाले. नऊ महिन्यांचा मुनाहीद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. मुस्कानने जखमी असतानाही बाळाला कवेत घेतले. मात्र, काही वेळातच बाळाची हालचाल थांबली. या अपघातानंतर तब्बल अर्धा तास कुणाचीही मदत मिळाली नाही. दरम्यान,एका वाहनचालकाने अपघातग्रस्त कुटुंबाला मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मुलगा मुनाहीद शेख याला मृत घोषित केले. तर मुस्कान यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुस्ताक शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राम बारोडे यांनी अज्ञात आरोपीविरूध्द अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader