नागपूर :  अनियंत्रित झालेल्या भरधाव टिप्परने रस्त्याच्या कडेला उभ्या कारला मागून धडक दिली. त्यानंतर टिप्पर एका पानठेल्यात शिरला.  टिप्परच्या धडकेत कारचा चुराडा झाला. या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर चौघे जण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शहरातील गोरेवाडा परिसरातील पलोटी शाळेसमोर झाला. या अपघातानंतर घटनास्थळावर एकच गर्दी झाली. पोलिसांनी चक्क क्रेनचा वापर करुन चुराडा झालेली कार रस्त्याच्या बाजुला केली. या घटनेनंतर आरोपी टिप्परचालक पळून गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक भरधाव टिप्पर गोरेवाडा पलोटी शाळेसमोरून जात होता. त्या टिप्परचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे टिप्परचालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले. भरधाव टिप्पर समोर असलेल्या एका कारवर आदळला. त्यानंतर टिप्पर रस्त्याच्या कडेला असलेल्या पानठेल्यात शिरला. या अपघातात कारचा चुराडा झाला. या कारच्या दरवाज्यात फसल्याने कारचालकाचा  जागीच मृत्यू झाला. तर पानठेलाचालक आणि  तीन ग्राहक असे एकून चार जण जखमी झाले.

पानठेलाचालकाला जबर मार लागला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. टिप्परच्या समोरील भागामध्ये कार फसली. त्यामुळे चालकाचा दबल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. चारही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.  अपघाताची माहिती मिळताच गिट्टीखदानचे  पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने हे पथकासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी चुराडा झालेल्या कारला काढण्यासाठी क्रेन बोलावली.

क्रेनच्या मदतीने कारमधील मृत युवकाला बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी तक्रारीवरुन आरोपी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. यावेळी घटनास्थळावर मोठी गर्दी उसळली. त्यामुळे पोलिसांना अपघातग्रस्तांना मदत करण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. शेवटी बघ्यांची पळापळ झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात रवाना केले. आरोपी टिप्परचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांचे मौन

रविवारी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नागपुरात आहेत. त्यामुळे अपघाताबाबत पोलिसांनी लपवाछपवी करण्याचा प्रयत्न केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने यांना अपघाताबाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. अपघात झाला असून अपघातात किती ठार आणि किती जण जखमी याबाबत सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.